अनु, खूपच छान लिहिलं आहेस गं. अगदी श्रीची आठवण आली माझ्या. तिलाही असाच लळा आहे मांजराच्या पिल्लांचा. तिने लाडाने मोठी केलेली 'ढेबी' केवळ दुधावर इथून पुढे जगू शकत नाही आणि तिला आवश्यक असं नॉनव्हेज देणं होणार नाही, हे ओळखून ती तिला सोडून आली खरी. पण आजही कुठे छोट्या मांजरीच्या पिल्लाचं म्यांव ऐकू आलं की धावत जाते आणि म्हणते माझी 'ढेबी' आली वाटतं. तिच्यासकट सर्वांना माहित असतं की ढेबी आता असेल तर मोठी मांजरी झाली असेल आणि नसेल तर ती म्यांव करू शकत नाही. जीव पिळवटून निघतो आतल्याआत..

एकदा रात्री एक मांजर तिचं एक पिल्लु असंच कुडकुडतं सोडून निघून गेली. खूप जोराचा पाऊस आल्याने लाईटही गेले होते त्यामुळे गच्चीत नक्की कुठे ते पिल्लू आहे ते शोधायला जाणंच शक्य नव्हतं. मध्यरात्र उलटून जाईतो जीवघेणेपणे मी आणि श्री ते म्यावम्याव ऐकत होतो आणि एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत तळमळत होतो. दुसऱ्या दिवशी पहाटेच गच्चीत जाऊन पाहिलं तर एक इवलासा देह तिथे निष्प्राण अवस्थेत पडलेला दिसला. आजुबाजुला पाणीचपाणी साठलेलं.. महिनाभर मन सैरभैर झालं होतं माझं.. रात्री स्वप्नात माझीच आई मला एकटीला सोडून कुठेशी निघून चालली आहे आणि मी तिच्या नावाने आक्रोश करतेय असं दिसायचं.. किती भयावह होती ती कल्पनाही.. मी मुर्खासारखं विचारून गेले होते आईला,"आई, तू मला असं एकटं सोडून तर नाही ना जाणार?" 

मांजर हाही प्राणी जीव वेडावून टाकणारातला आहे, हे मी अनुभवलं आहे. अगदी सर्वार्थाने. नेहमी ठरवते की आता इथून पुढे नाही माया लावायची कोणा मांजरावर पण.........

तुझ्या अनुभवकथनाने माझे सग्गळे अनुभव परत अनुभवल्यासारखे वाटून गेले... डोळ्यातले अश्रू आनंदाचे की दुःखाचे.. ठरवणं खूप कठीण आहे..