रसिक वाचक मंडळी,

कथा(कथा म्हणण्यापेक्षा रोज समोर दिसणारे प्रसंग) वाचल्याबद्दल आभार.
'मी एक कावळा' शी काही ठिकाणी जाणवणारे साम्य खरे आहे. वेदश्रीची 'मनाली' कथाही मी वाचली आहे. (माणसाची जात वगैरे मी 'मी एक कावळा' आणि 'जनावर' कथेत वाचले होते, आणि तिरंगी आईचं वागणं पाहिल्यावर ते पटलेही. प्राणी चेहऱ्याच्या भावांनी नाही तरी त्यांच्या आवाजातून आणि हालचालीतून भावना व्यक्त करतात हे पटते. त्यामुळे नकळत वाक्यांवर तशी छाप पडली आहेच. तसेही पाळीव प्राण्यांवर(खास करुन मांजर,कुत्रा) प्रेम करणाऱ्यांचे बरेच अनुभव काहीअंशी सारखे निघतात. तो बालभारतीतला 'लळा' धडा आठवतो ना?)

कथेच्या लांबीबद्दलच्या अडचणी मलाही पटतात. काही संगणकांवर मनोगताचे पान त्यातील वेगळ्या अक्षरसंचामुळे खूप सावकाश सरकते आणि कधीकधी अडकतेदेखील. (माझ्याच संगणकावर मी मनोगतातील एक वाक्य टंकलेखित करते आणि ते उमटेपर्यंत कंगवा काढून केस विंचरते आणि पावडर थापते म्हणजे बघा!!) पण मनात विषय आला कि थांबवत नाही दुसऱ्या भागापर्यंत. अगदी दोन भाग करायचेच असले तर कधीकधी स्वतःला दुसरा भाग डोक्यात विषय ताजा असेपर्यंत व्य. नि. मधून पाठवते. यापुढे ही लांबी दोन भाग करुन एका दिसणाऱ्या पानात माववण्याचा प्रयत्न नक्कीच राहील.

तसे गाढव , माकड पोपट इ.इ. वर लिहायलाही काही हरकत नाही, पण त्यांचे जीवन इतक्या जवळून पहायलाच मिळत नाही शहरी वातावरणात. त्यामुळे वर्णनात जास्त वास्तव येणार नाही अशी भिती आहे. ('त्यांचं जीवन जवळून बघायला दूर कशाला जायला पाहिजे?आरशात बघ' असं म्हणायचं नाही हं आता कुणी!!)

लिखाण ज्यांना आवडले नाही त्यांनी लिखाण वाचण्यासाठी आपला बहुमोल वेळ(आणि पैसे)घालवल्याबद्दल त्यांचेही आभार.

असाच लोभ राहू दे..
-अनु