अंजू, अनुभव अगदी मनमोकळेपणे लिहिला आहेस. छान झाला आहे. कथेत का टाकलास ते मात्र कळलं नाही. अशा छोट्यामोठ्या अपघातांच्या गोष्टी खरंच होतच असतात, नेमक्या त्या क्षणी ( at that very moment ) भिती वगैरे जरूर वाटते पण कायम घाबरून रहायची गरज नाही. जास्तीतजास्त सतर्क रहायचा प्रयत्न करायचं बस्स.. जे होईल त्याला तोंड द्यायची तयारी असू द्यायची.

तुझ्या अनुभवकथनावरून कुठेसा वाचलेला एक किस्सा आठवला. मूळ रचना तशीच्या तशी आठवत नसल्याने मूळ संकल्पना माझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतेय. चु.भू.द्या.घ्या.

क : का रे ख, तुला बसमधून प्रवास करायची भिती नाही का वाटत?
ख : का बुवा? भिती का वाटायला हवी?
क : मला सांग, तुझे आजोबा कसे वारले?
ख : बसमधून जाताना अपघात झाला आणि त्यात ते वारले.
क : आणि तुझे वडील?
ख : त्यांचाही बसमधून जाताना अपघात झाला आणि ते वारले. पण याचा काय संबंध?
क : तुझे आजोबा, बाबा दोघंही बसमधून प्रवास करताना वारले मग तुला भिती नाही का वाटत बसमधून प्रवास करताना?
ख : ओऽऽऽह.. असं म्हणतोयस होय. मग आता माझ्या प्रश्नांची उत्तर दे. तुझे आजोबा कुठे वारले?
क : रात्री झोपले होते दिवाणावर मस्त आणि सकाळी बघितलं तर कारभार आटोपलेला होता त्यांचा.
ख : आणि तुझे बाबा?
क : त्यांचाही श्वास दिवाणावर पहुडलेले असतानाच मालवला.
ख : मग आता सांग तुझे आजोबा , बाबा दोघंही जर दिवाणावर झोपलेले असताना वारले तर तुला भिती वाटते का दिवाणावर झोपायची? तू जर दिवाणावर ढाराढूर झोपू शकतोस तर मग मी का बसमधून प्रवास करायची भिती बाळगायला हवी?

विषयांतर झाले असल्यास माफ करावे, पण सांगायचं एकच होतं की अशा गोष्टींनी कायमची मनात भिती बाळगण्यात काहीही अर्थ नाही, त्या भावनांमधून बाहेर पडण्यातच खरी कसोटी आहे. 

अनुभवकथन खूपच छान आहे. वाचताना जणू काही माझी एखादी मैत्रिणच मला तिचा अनुभव सांगत असल्याचा भास झाला, म्हणून हा प्रतिसादप्रपंच. काही आवडले नसल्यास माफ करावे, ही विनंती.