वा माधवराव,

ठेचा फारच चविष्ट झालाय. हा अस्सल खांदेशी ठेचा आहे. वऱ्हाडी ठेचा बहुधा लाल मिरच्यांचा असतो. तोही छान लागतो.  खानदेशी डाळगंडोरी विषयी कुणाला माहिती आहे का? हा पदार्थ म्हणजे झणझणीतपणाची कमाल आहे. यालाच ग्रामीण भागात "दायगंडोरी" किंवा मिरच्यांची भाजी देखील म्हणतात. हिरव्या गार मिरच्या, आंबटचुका, लसूण, खोबऱ्याचे काप, शेंगदाणे हे पदार्थ डाळगंडोरीचे जीव की प्राण. हा पदार्थ कुणीही उठून करावा असा नाही. त्याला विशिष्ट हातच लागतात. बऱ्याच वर्षांचा सराव लागतो. ज्वारीच्या २-३ भाकरी कुस्करून त्यावर गरमागरम डाळगंडोरी किमान ४-५ वाट्या ओतावी. त्यावर अर्धे लिंबू पिळावे आणि इकडे-तिकडे अजिबात न बघता, गप्पांना अजिबात थारा न देता ७-८ मिनिटात ताट स्वच्छ करावे. पुन्हा भुकेनुसार आणि खाण्याच्या क्षमतेनुसार १ किंवा २ भाकरी वरिलप्रमाणे हादडाव्यात. भाताला या सोयरिकीमध्ये तसे फारसे स्थान नाही. त्यामुळे तो टाळून २-३ वाट्या गरम लिंबूरस मिश्रीत डाळगंडोरी प्यावी आणि तृप्तीचा ढेकर देत पानावरून उठावे. हा पदार्थ कमालीचा तिखट आणि तितकाच रुचकर असतो. तिखट वर्ज्य असणाऱ्यांनी या पदार्थाच्या वाटेला चुकूनही जाऊ नये. पहिल्या १-२ घासातच नाका-डोळ्यातून पाणी यायला लागते, कानातून वाफा यायला लागतात. यात लाल तिखट टाकत नाहीत.

यावल, रावेर या भागात उगम पावलेला असाच एक पदार्थ म्हणजे फौजदारी दाळ. तमाम दाळींना एकत्र करून तयार केलेले हे अतितिखट वरण भाकरीसोबत छान लागते.

शेवभाजी, भरीत, डाळगंडोरी, फौजदारी दाळ, ठेचा, बिबड्या (पापड), वालाच्या शेंगाची भाजी हे पदार्थ म्हणजे खांदेशच्या खाद्यसंस्कृतीचे भक्कम असे आधारस्तंभ आहेत.