भूत गप्पांवरून एक अनुभव सांगावासा वाटतोय साधारण वर्षापूर्वीची गोष्ट...

१२ - १२ ३०  रात्रीच्या सुमारास एका मित्राचा फोन आला. मुलुंडहून पार्ल्याला परतताना त्याची आई बसलेल्या रिक्षाला अपघात झाला होता आणि तिची अवस्था गंभीर होती यामुळे तिला एक पाय गमवावा लागला आणि आता सगळं काही ठीक आहे. तर त्यावेळी मी घरुन तिथे (पवई हॉस्पिटल) जाण्यासाठी निघालो. सुदैवाने मला माझ्या घराबाहेरच रिक्षा मिळाली. पवईजवळ वाटेत मी पत्ता विचारत पुढे जात होतो. पुढे तलावाजवळ सामसूम रस्त्यावर मला एक माणूस दिसला आणि गणवेशावरुन तो  सुरक्षारक्षक वाटत होता. त्याला पत्ता विचारला त्याने आगे जाव असं काहीतरी फ़ुटकळ उत्तर दिलं. तो जिथे उभा होता त्यासमोर रस्त्यापलिकडे १ / २  इमारती होत्या (बहुदा कुठल्यातरी संस्थांच्या ) ज्या बंद होत्या आणि तसंही त्याच्या उभं रहाण्यावरून तो रस्ता ओलांडणार आहे असंदेखिल वाटत नव्हतं.

मला काहीतरी विचित्र वाटलं आणि का कुणास ठाऊक पण असं वाटलं की पुढे गेल्यावर वळून पाहिलं तर हा दिसणार नाही.

तसंच झालं. आणि मी पाठी वळून बघेपर्यंत मध्ये फ़ारतर मध्ये ५ सेकंद झाले असतील. तेवढ्या वेळात तो रस्ता ओलांडण्याची शक्यता ८०%नव्हती जर पाठीमागे गेला असेल तर मला त्याच्या मागे काही दिसलं सुद्धा नव्हतं (झुडुपं होती).

अर्थात मी याचा निष्कर्ष मला भूत दिसलं असा काढणं बरोबर नाही याची मला जाणीव आहे. कदाचित माझ्या बघण्यात चूक झाली असेल किंवा तिथे त्याच्या पाठी घर किंवा रहाण्यासारखं काहीतरी असेल देखिल जिथे तो लगेच गेला. परंतु एक विचित्र जाणीव/संवेदना, इथे काहीतरी चुकतय असं वाटणं यामुळे हा अनुभव माझ्या जास्त लक्षात राहिलाय.