सर्व प्रतिसादांबद्दल आभार मंडळी.
इंग्रजी वाड़्मयात खूप सुंदर कथा आहेत. वाचनालय आणि रद्दीची दुकाने यामुळे त्यातील काही वाचायची संधी मिळाली. प्रस्तुत अनुवाद हा 'अनुवाद निर्मीती' म्हणून लिहीलेला नसून कथेचा गोषवारा वाचून अधिकाधीक वाचकांनी मूळ कथा वाचावी म्हणून लिहीला आहे. खरं म्हणजे आंग्ल/परदेशी कथांचा अनुवाद (कथेचा मूळ अर्थ हरवू न देता आणि अगदी यांत्रिक शब्दशः भाषांतर वाटून वाचकांना बोअर न करता) हे तसं कठीणच काम. पु.ल.,शांता शेळके आणि काही मोजक्याच लेखकांना ते परिणामकारक जमतं कारण परदेशी आणि आपल्या संस्कृती/रुढी/हवामानातील फरक. त्यामुळे मग गजाननरावांसारख्या देवाचे नाव असलेल्या सात्विक माणसाला बियर पिववण्याचे 'पातक' आणि सीमा सुहास चिनू सारख्या हिंदू कुटुंबात पुरण्याचे अंत्यसंस्कार आणण्याचे नवीन रिवाज मला बनवावे लागले!! तसेच या कथेत तसं म्हटलं तर 'पिंकीचं काय झालं पुढे, जर सीमाचं भूत आणि सुहास नांदले तर?' असा अनुत्तरीत प्रश्न येतोच. मूळ चित्रपटात शेवटी सीमाच्या भूताने सुहासला सुऱ्याने भोसकल्याचे दाखवून चित्रपट संपवला आहे. मूळ कथेत सीमाला तिच्या मोठ्या बहिणीचे मरतानाचे भयानक रुप सारखे आठवून भिती वाटण्याची घटनाही आहे. पण टंकलेखनाच्या कंटाळ्यामुळे ती येथे टाळली आहे.
पण तरीही 'हे पुस्तक वाचा, खरोखर छान आहे' असं वाचकांना कळवण्यासाठीच हा अनुवादप्रपंच. माझं स्वतःचं असं मत आहे की परदेशी पुस्तकांच्या स्थानिक कमी प्रतीच्या कागदावर इ. आवृत्ती जास्त प्रमाणात मिळायला लागल्या तर त्यांच्या किमती सामान्य जनतेला परवडतील आणि वाचनाची आवड वाढेल. (आजही ३००-४०० रु. चं आंग्ल पुस्तक विकत घेताना मनात वाटतंच, 'इतकं काय नडलंय? एकदा वाचलंय ना? आणि शेवटी चैनच ना ही? या पैशात हवं असलेलं अभ्यासाचं/तांत्रिक पुस्तक घे..')
शेरलॉक होम्सच्या सर्व कथा ऑनलाइन मिळाल्या तेव्हा खूप आनंद झाला. त्या येथे वाचा.
-अनु