प्रवासीमहाशय,
आज हरिपाठावरील लिखाणाला आपला प्रतिसाद पाहिला. आश्चर्य आणि आनंद दोन्हींचा लाभ झाला. आपणही हरिपाठावरील लिखाण आवडीने वाचता ह्याहून भाग्याची गोष्ट ती कोणती ?
मी लिहिण्याच्या सुरुवातीलाच सांगितले होते की,
ज्ञानदेवांच्या हरिपाठावर लिहिताना मी काही ग्रंथांचा आधार घेतला आहे.
मुख्य आधार.. ज्ञानेशांचा संदेश..सद्गुरू श्री.वामनराव पै.
संदर्भ ग्रंथ.. १. श्रीज्ञानदेवांचा हरिपाठ.. के.वि.बेलसरे
२. हरिमुखे म्हणा.. कौसल्या गोरे
"रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडी तू अवगुणु रे भ्रमरा ॥" असे जरी श्री.ज्ञानेश्वरांनी एका अभंगातून सांगितले असले तरी माझी ही भ्रमरवृत्ती मात्र अवगुणु न ठरता लाभदायकच ठरो. माझ्यातील साधकवृत्ती अधिक उजळून निघावी हिच मनिषा आहे.
त्याच बरोबर वाचकांच्या मनात नामाबद्दल गोडी निर्माण होवून त्यांनाही नामाचा छंद लागावा हिच अपेक्षा आहे.
मी हरिपाठावरील ३-४ ग्रंथ वाचून हे लिखाण करीत आहे. ते निवडतांना माझी साधना, माझे अनुभव आणि चिंतन ह्याचाही आधार घेतला आहे. अगदी सांगायचे तर पहिल्या अभंगातील abstract वगैरे कल्पना किंवा नाम=ना अहं असा अर्थ माझा मीच लावला आहे. काही वेळा काही लेखकांनी काही गोष्टींना महत्त्व दिले नाही. पण मला त्या महत्त्वाच्या वाटल्या. त्या मी माझ्यापरीने ज्ञानेश्वरीचे परिशिष्ट, इतर ग्रंथ ह्यातून मिळविल्या आहेत. मुख्य भर मात्र सद्गुरू वामनराव पै आणि के.वि.बेलसरे ह्यांच्या ग्रंथावर आहे.
वर मी मुद्दामच निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा वापरल्या आहेत. समजणे,उमजणे आणि आकळणे ह्यातील फरक समजावून देतांना ह्यांची मदत घ्यावीशी वाटली.
सर्वसामान्य बौद्धिक कुवतीच्या माणसालाही एखादी गोष्ट समजते. पण जेव्हा दोन व्यक्तींमध्ये भावनिक ऐक्य असते तेव्हा एका व्यक्तीला जे सांगायचे आहे ते दुसऱ्या व्यक्तीला आधीच उमजलेले असते असे आपण म्हणतो. काही वेळा प्रतिभावंतांच्या कलेचे आकलन होत नाही . आपण कविता, गज़ला लिहिता. त्या समजायला एक वेगळीच प्रतिभा असेल तर त्या लिखाणाचे आकलन होण्यास सहज मदत होते. जाणीव जशी सूक्ष्म होत जाते, तरल होत जाते तशी ही प्रतिभा उभारून येते असे मला वाटते. सद्गुरूंनी दिव्यसाधना देण्याअगोदर वाचलेले अभंग त्या साधनेनंतर वाचण्यात आणि समजण्यात खूप फरक असतो. मी ह्यालाच आकळणे म्हणतो.
माझ्यापरीने मी घेतलेला अर्थबोध देत आहे. पूर्ण सत्य काय हे जाणकारच सांगू शकतील. मी आधीच म्हटले आहे की मीही एक साधकच आहे ह्याची जाणीव ठेवूनच मी लिहितो आहे. हरिपाठ एकादशावर्तन करताना जो आनंद मिळाला नव्हता त्याहून अधिक आनंद एका अभंगावर आठवडाभर चिंतन करून लिहिताना होतो आहे. आपण वाचता आणि विचारता हेच माझे भाग्य!