विलासराव ! 'हरिपाठा'वरील विवरण छान आहे. आपण लगेच शंका समाधानही करता. ह्या अभंगात दोन तीन शब्दांबद्दल मला जो अर्थ वाटतो तो मांडावासा वाटतो. ह्यावर चर्चा झाल्यास नेहमीसाठी माझेही शंका निरसन होईल. 
      मला वाटते इथे "जाणीव" शब्दाचा अर्थ आपण व्यवहारात वापरतो तसा नाही. जाण, जाणणे, जाणीव, जाणीवपूर्वक हा एक वर्ग झाला. पण शास्त्र-ग्रंथांतून वापरलेला जाणीव शब्द बर्‍याच ठिकाणी या अर्थाने नसतो असे मला वाटते. ऐतरेय उपनिषनिदांतील शेवटच्या अध्यायात 'प्रज्ञा'बद्दल बरेच बोलून 'प्रज्ञानं ब्रह्म' म्हटले आहे. ही प्रज्ञा सर्व प्राणिमात्र तसेच स्थावर-जंगमाचा आधार आहे. ह्यालाच 'योगवसिष्ठ'मध्ये 'चिद्‌' वा 'चिति' म्हटले आहे. इतरत्र त्याला 'चैतन्य' म्हटले आहे. चैतन्य, चिति, प्रज्ञा सर्व ज्ञानमय आहे. तशीच 'जाणीव'ही ज्ञानमय आहे. ती बुद्धीत समाविष्ट नाही. बुद्धि त्यांत समाविष्ट आहे. ह्यालाच इंग्रजीमध्ये "all pervading conciousness" म्हणतात. भूमीचा उतार हे जसे वाहत्या नदीचे अधिष्ठान आहे [उतार नाही तर वाहणे नाही आणि वहात नाही तर ती नदी कसली], तद्‌वत वरील शब्द हे दृश्य जगताचे अधिष्ठान आहे. पण ह्याचा अर्थ "आत्मा"ही नव्हे. परमेश्वराच्या अनंत शक्‍तींपैकी ही एक शक्ती आहे. 'जाणीव'चा असा अर्थबोध करणारा पर्यायी शब्द मराठीत दिसत नाही. जवळचा शब्द म्हणजे 'जागृती' म्हणता येईल.
      समजणे, उमजणे, आकलन ह्याचे श्रावणीने थोडे स्पष्टीकरण केले आहे. पण ह्या शब्दांचा 'ज्ञानाच्या पायर्‍या' म्हणून जरा वेगळा अर्थ अभिप्रेत असतो. आपण जेंव्हा भगवंताचे नाम घेतो तेंव्हा ते नाम घेताना , तो भगवंत 'सर्वांभूती' आहे ह्याची जाण ठेवून त्याला सर्वत्र पाहणे हा हेतू अभिप्रेत असतो. टीव्हीपुढे बसून तसाभरता 20 माळा ओढून आपण एक तास 'नामजपाचा' पुरुषार्थ केला अशी गोड समजूत आपण करून घेतो. आपले प्रेम आपली पत्नी(पती), मुले, आईबाप बहीण-भाऊ असे मर्यादित असते. हे वर्तुळ जर वाढायला लागले, शेजारचे एकाद्या गरीबाचे पोर भूक लागली म्हणून टाहो फोडून रडत असता आपल्याला त्याचा कळवळा आला, तर तेंव्हा 'नाम' समजायला लागले म्हणायला हरकत नाही. मग पुढे चित्त-वृत्ति शुद्ध व्हायला लागल्या, काम-क्रोध-लोभ यांचा अंमल कमी होऊन आपले हित नेमके कशात आहे हे कळायला लागले, थोडासा अनुभव यायला लागला, आणि मग खरी साधना सुरू झाली की 'उमजायला' लागले म्हणायला हरकत नाही. जांब गावचा नारायण ठोसर याला "सावधान" शब्द उच्चारल्याबरोबर सावधान म्हणजे काय ते समजले, आणि उमजले तोपर्यंत त्याला सगळे लोक समर्थ रामदास स्वामी म्हणायला लागले. उमजे पर्यंत उच्चकोटीच्या 'नैरंतर्य सत्कारसेवितो' दृढभुमि होईपर्यंत उपासनेची आवश्यकता आहे. 'आकळणे' ही अवस्था तर ! काय सांगावे. तेथे पर-अपर भेदच नसतो. नामाचे आकलन झाले तरच नारदासारखा माणूस वाल्याला न घाबरता त्याच्या उद्धाराबद्दल विचार करू शकतो. श्री शेवडे महाराजांनी प्रवचनांतून एकदा एक गोष्ट सांगितली होती, ती सांगावीशी वाटते. गोष्टीचा हेतू काय होता ते आठवत नाही पण "आकळणे"च्या स्पष्टीकरणासाठी ती उपयोगी आहे. 
      "पर धनाचा उपभोग घेणे हे पाप आहे" हे आपल्याला माहीत आहे. पण त्याचा आध्यात्मिक अर्थाचे आपल्याला 'आकलन' आहे का हे गोष्ट वाचून ठरवता येईल. कोंकणातील ग्रामीण भागातील ऐन उन्हाळ्यातील एक दुपारची वेळ. महाराज पडवीत हाशहुश करत बसले आहेत. रस्त्यावरून एक अतिशय थकलेली वृद्ध म्हातारी लाकडाची मोळी घेऊन विकायला निघालीय. घरात खूप सरपण असतानाही महाराजांनी तिचे कष्ट कमी व्हावेत म्हणून तिला हाक मारून ती मोळी विकत घेतली. तिने सांगितले त्याप्रमाणे पैसे दिले. तांब्याभर पाणी पिऊन ती म्हातारी निघून गेली. पण दोन तासांनी तशाच रणरणत्या उन्हांतून ती परत आली. महाराजांना म्हणाली, " बाबा पैसे मोजून दिले होतेस का ? ". महाराजांना वाईट वाटले, थोड्याश्या निष्काळजीपणा मुळे एकादा पैसा कमी गेला असेल पण म्हातारीला परत उन्हाचा त्रास सहन करावा लागलाच. त्यांनी विचारले " का ग, कमी होते का ? ". ती म्हणाली, " नाही, एक पै जास्त आलीय. ती परत करायला लगेच आले " "अग एक पैच ना ? राहिली असती तर काय बिघडत नव्हते. त्याने काही माझ्या घरावर सोन्याची कौलं पडणार होती का ? ". ती म्हणाली " बाबा, तुझ्या घरावर सोन्याची कौलं नसती लागली, पण मला तुझे कर्ज फेडण्यासाठी परत जन्म घ्यावा लागला असता ना ! ". मला वाटते म्हातारीला 'परधन उपभोग' म्हणजे पाप ह्या तत्त्वाचे पूर्ण आकलन झाले होते.
     बापरे ! प्रतिसाद खूपच लांबला. क्षमस्व.