वावा मानसराव! अतिसय सुंदर आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी घडलेली गज़ल आहे ही (नटलेली म्हणणार होते पण कवितेत व्यक्त केलेल्या दुःखामुळे जो विषाद वाटतो त्याच्या पार्श्वभूमीवर नटलेली म्हणताना मन चरकतं...)

यातली प्रत्येक कल्पना नवीन आहे आणि तुमच्या कल्पनाशक्तीची झेप किती मोठी आहे याची चुणूक दाखवून जाते.

पहिलाच शेर(शेरच म्हणतात ना?)

चेहऱ्यामागुन निघतो, रोज नवखा चेहरा,
मज तिऱ्हाईत भासतो मग, ओळखीचा चेहरा!

वाचून सुरेश भटांच्या
'गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी ,
मी कशी होते मलाही आठवावे लागले'
या ओळींची आठवण झाली. 

               शेवटी आलात सवडीने, सुखांनो हाय पण,
               झाकला आहे फुलांनी, आज माझा चेहरा!
या शेराबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. केवळ अप्रतिम...

 

               रंग चढवु कोठला नी कलप लावु कोणता?
               -मांडतो बाजार आहे, माणसाचा चेहरा!
यातून आजच्या सगळ्या गोष्टींचे व्यापारीकरण करण्याच्या प्रवृत्तीवर छान भाष्य तुम्ही केले आहे.

 

              आरसा तु हो मनाचा, अन स्वत:ला शोध रे,
               सापडे तेव्हाच मित्रा, तुज स्वत:चा चेहरा!
या ओळी पण अतिशय आवडल्या. मला गज़लेचं व्याकरण फारसं कळत नाही पण तुम्ही जे लिहिलं आहे ते मनाला अगदी भिडतं हे मात्र खरं.

 

--अदिती