महोदय,

हुतात्म्यांचा त्याग्याच्या आठवणीने रोमांच उभे रहात असले तरी लेखाच्या शेवटी 'सम्यक' दृष्टीने विचार करायला हवा , हे आवाहन मला जास्त महत्त्वाचे वाटते.

एकेकाळी अतिशय प्रगत असलेला महाराष्ट्र आता पहिल्या पाचातही नसावा हे दुर्दैव आहे.

रस्ते/पाणी/शेती/सहकार/वीज/उद्योगधंदे अशा सगळ्याच बाबतीत महाराष्त्राने लज्जस्पद अधोगती केलेली आहे. याची जबाबदारी केवळ राज्यकर्त्यांवर न ढकलता, या अधोगतीत जनतेचा सहभागही तितकाच आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटेल.

ज्या महाराष्ट्राने अनेक पुरोगामी चळवळींना जन्म दिला, तिथे अंधश्रद्धेचे पीक फोफावते हे दुर्दैव आहे. म्हणजे पुरोगामी चळवळींचा विकास न होता, अंधश्रद्धा वाढाते, तिथेच समाजाचा पराभव आहे.

शिवाय, शैक्षणिक/आर्थिक विकास न झाल्याने 'खालच्या दर्जाचा' वर्ग मोठ्या प्रमाणावर तयार झाला. या वर्गाला मतपेटीकडे आकर्षित करण्यासाठी प्रगती/विचारधारा असे मार्ग वापरता येत नाहीत. त्यांच्या साठी मग जातीचे/धर्माचे राजकारण, मूर्ख भावनांना चेतवणे असे प्रकार राजकारण्यांकडून वापरले जातात. आणि दुय्यम दर्जाचे राजकारणी सत्तेवर येतात. अशा दुय्यम दर्जाच्या राजकारण्यांकडून विकासकामांची अपेक्षा कशी ठेवणार ?

या सगळ्यात मध्यमवर्ग हतबलतेने किंवा उदासिनतेने संपूर्ण समाज घडवण्याच्या प्रक्रियेपासूनच दूर रहातो. त्याचाही फायदा संधीसाधू लोकांना मिळतो.

माझ्या अल्पमतिप्रमाणे, निवडणूक प्रक्रियेवर मध्यमवर्गाचे घट्ट नियंत्रण असायला हवे. ज्यांना समाजाचे हीत कळते अशा लोकांनी राजकारणात सक्रिय भाग घ्यावा. ( नारायणमूर्तींनी राजकारणात प्रवेश नाकारला, हेही देशाचे एक प्रकारे दुर्दैवच ! ) राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे राजकारणापासून दूर राहून समाजकारण करणे अवघड असते.

उदारहणार्थ, मला अभय बंगांविषयी अतिशय आदर आहे. कुपोषणावर त्यांनी केलेले काम फारच महान आहे. त्यांनी काढलेले निष्कर्श आणि त्यांनी दिलेल्या सूचना राबविल्या गेल्या तर कुपोषणाचा प्रश्न फार लवकर सुचेल. पण असे होते, की बंग अतिशय अभ्यासपूर्ण रितीने मेहनत घेऊन अहवाल तयार करतात, सरकारला देतात. आणि सरकार ( म्हणजे राजकीय नेते ) स्वतःच्या सोयीप्रमाणे ते अहवाल वापरते. मतांची सोय पहाते. आणि अहवालाचा मूळ उद्देश हरवतो.

त्याऐवजी स्वतः बंग साहेब किंवा त्यांच्या कर्तृत्वाची किंमत जाणणारा कुणी सत्तेवर असेल, तर राजकारण आणि समाजकारण एकमेकास पूरक होऊन, विकास लवकर साधला जाईल.

तशी एक सुरवात अविनाश धर्माधिकारी यांनी केली होती. परंतू एका पराभवाने त्यांनी राजकारणाकडे पाठ फ़िरवली. अर्थात, माझ्यासाठी हे फार सोपे आहे लिहायला, पण अशा स्वच्छ आणि हुशार लोकांनी मनानेही कणखर असायला हवे.

असो.

माझे म्हणणे इतकेच की फक्त राजकारण्यांवर दोष देऊन उपयोग नाही. समाज घडवण्याच्या प्रक्रियेत जोवर समाजातला जबाबदार घटक स्वतःला पूर्णपणे सामिल करून घेत नाही, ( किंवा धर्म/जात अशाच उगाचच्या भावनिक प्रश्नात अडकतो ) तोवर समाजाची अधोगती होतच रहाणार. दुर्दैवाने, महाराष्ट्र याच स्थितीतून जात आहे.