वरून फोडणी दिल्यावर पदार्थावर लगेच झाकण ठेवावे. फोडणीचा खमंगपणा वाफेबरोबर बाहेर उडून जाऊ देऊ नये. १० मिनिटांनी झाकण काढून ढवळावे.

दह्याच्या कोशिंबिरीला फोडणी थंड करून मग द्यावी. नाहीतर दही आंबट होते. 

फोडणीत लसूण घालायचा झाल्यास सर्वात शेवटी घालून चांगला काळपट लाल होई पर्यंत तळावा नंतर ती फोडणी पदार्थाला द्यावी (लगेच झाकण ठेवावे.).

लोणच्यांना द्यायची फोडणीही थंड करून मग द्यावी.

फोडणीत तिखट घालायचे झाल्यास कढले गॅस वरून खाली उतरवून मग त्यात तिखट घालावे.

कडकडीत मोहरीच्या फोडणीत बारीक चिरलेला लसूण काळपट लाल रंगावर तळून, कढले गॅसवरून खाली उतरवून नंतर (तापमान थोडे उतरल्यावर) त्यात लाल तिखट आणि मीठ घालावे. फोडणी अजून थोडी थंड झाल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. हे मिश्रण मुगाच्या खिचडीवर अत्युत्कृष्ट लागते. (सोबत तळलेला पापड आणि लोणच्याची फोड.... अहाहा!)