एक म्हणजे "विशेषाधिकार" हे अगदीच "सरकारी भाषांतर" वाटते. (आणि तेही हिंदीतले/केंद्रसरकारी, मराठी/महाराष्ट्रातील नव्हे.) पण तो मुद्दा सोडा.

दुसरे म्हणजे, मला वाटते "विशेषाधिकार" तितकेसे योग्य होणार नाही. कारण "विशेषाधिकारा"तसुद्धा "अधिकार" हा आलाच. पण "प्रिव्हिलेज"मध्ये खरे तर अधिकाराचा भाग येत नाही. उदाहरणार्थ, "ड्रायव्हिंग इज़ अ प्रिव्हिलेज, नॉट अ राईट." रस्त्यावर वाहन चालवण्याचा कोणालाही हक्क/अधिकार (राईट) नाही. वाहनचालकाचा परवाना देऊन शासन आपल्याला शासनाच्या मर्जीनुसार (अर्थात काही नियमांना अनुसरून) एक विशेष संधी/उपलब्धी देत असते. तसेच (काही कायदे न पाळल्यास - पुन्हा काही नियमांना अनुसरून) ते तो परवाना / ती संधी/उपलब्धी हिरावूनसुद्धा घेऊ शकते. अशा परिस्थितीत आपण त्याविरुद्ध "हा माझा अधिकार आहे" म्हणून लढू शकत नाही.

"प्रिव्हिलेजेस" ही मुळात नसतात, ती दिली जातात व काढूनही घेतली जाऊ शकतात. हक्क/अधिकारांचे तसे नसते: ते मुळातच असतात, आणि कोणीही (वैधरीत्या) हिरावून घेऊ शकत नाही.

असो. "प्रिव्हिलेज"साठी मराठीत योग्य/चपखल बसणारा प्रतिशब्द - आणि तोही नेहमीच्या वापरातला/बोलीभाषेतला - आहे, याची मला खात्री आहे. या क्षणी तो मला आठवत नाही आहे. कोणी मदत केल्यास ऋणी राहीन.

- टग्या