मराठी माणसांविषयी आजवर मी जे अनुभवले ते थोडे विचित्रच आहे.  माझे मत थोडे-बहुत सुदर्शन यांच्या मताशी जुळणारे आहे.

मराठी माणसांना स्वतःविषयी कायम एक न्यूनगंड असतो. त्यामुळे भारतात जसं कायम गोऱ्या कातडीचा लांगुलचालनासम आदर केला जातो, त्याप्रमाणे उत्तर भारतीय लोकांचा, हिंदीचा मराठी लोकांमध्ये आदर करण्याची, त्यांचा आणि हिंदीचा दरारा आहे असं वाटून घेण्याची आणि हिंदी बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करून त्यांच्यासारखे आणि उच्चभ्रू आपण आहोत हे दाखविण्याची अहमहिका लागलेली असते. मी स्वतः गावी गेलो की कपड्यांवरून बस कंडक्टर, इतर लोकं मला उत्तर भारतीय किंवा अमराठी समजून हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करतात. मी निग्रहाने मराठी बोलून देखील ते त्यांचं हिंदी बोलून आपण उच्चभ्रू आहोत हे दाखविण्याची धडपड सोडत नाहीत. परवा मी पुण्यातल्या एका कॅसेटच्या दुकानात गेलो होतो. दुकानदाराने अतिशय आस्थेने मला हिंदीत विचारणा करून काय हवे आहे असे विचारले. मी शुद्ध मराठीत त्याला ध्वनिफितींची नावे सांगितल्यावर त्याचा भ्रमनिरास झाला आणि त्याने माझ्यासमोर २-३ कॅसेट्स टाकून गणकयंत्र आणि ५-७ कागदांच्या कामात स्वतःला झोकून दिले. मी त्याला २-३ प्रश्न विचारले, त्याने मान ही वर न करता, अतिशय कोरड्या स्वरात उत्तरे दिली. तरीही मी त्याला "अजून काही अशाच कॅसेट्स आहेत का?" असे विचारले, त्याने पुन्हा मान वर न करता फक्त नकारार्थी हलवली आणि मी त्या दुकानातून बाहेर पडलो. असे अनुभव आता पुण्यासरख्या ठिकाणी खूप वेळा यायला लागले आहेत.

मराठी बोलण्याची आजकाल मराठी माणसाला लाज वाटते हे खरे. ऑफिसेस (संगणक क्षेत्रातील) सारख्या ठिकाणीदेखील २ मराठी कर्मचारी हिंदीत बोलणे पसंद करतात. मराठी बोलणे म्हणजे अगदीच गावरान प्रकार असे त्यांना वाटते. तेच दाक्षिणात्य लोकं बिनधास्त त्यांच्या भाषेत बोलतात आणि एकी टिकवून ठेवतात. त्यांना कुणीही नावे ठेवत नाहीत.

मराठी माणसामध्ये आक्रमकता, आत्मविश्वास आणि धाडस यांची कमतरता आहे म्हणून उत्तर भारतीय लोकं खुशाल इथे येऊन इथल्या मराठी लोकांवर वचक बसवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात मुंबई सारख्या आणि कमी-अधिक प्रमाणात पुण्यासारख्या ठिकाणी यशस्वी देखील होतात. अशा वेळेस आपण शिष्टाचार वगैरे गोष्टींना थारा देत बसलो तर त्याला आपला कमकुवतपणा (जो की बऱ्याच अंशी असतो) समजून आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न हे लोक करतात.

मी कॉलेजला असतांना कितीतरी मराठी विद्यार्थी असे होते ज्यांना मराठी मुलांच्या गटांपेक्षा अमराठी आणि त्यातल्या त्यात उत्तर भारतीयांच्या गटांत असणे म्हणजे खूप सन्मानाची बाब आहे असे वाटत असे आणि त्यासाठी त्यांची केविलवाणी धडपडही चालत असे.

फार वर्षांपूर्वी मी एकदा पुण्यात मराठी कॉपीरायटर च्या एका पदाच्या मुलाखतीसाठी गेलो होतो.  ज्या महिलेने माझी मुलाखत घेतली ती शुद्ध पुणेरी मराठी महिला होती, पद ही मराठी कॉपीरायटर असे होते, काम सगळे मराठीतच असणार होते आणि तरीही त्या महान महिलेने माझी संपूर्ण मुलाखत इंग्रजीमध्ये घेतली. हा आचरटपणाचा कळस होता.

मुळात या सगळ्या बाबींवर सामान्य मराठी माणूस विचार करायलाच तयार नाही. जोपर्यंत आपल्याला कुठल्या गोष्टीची झळ पोहोचत नाही तोपर्यंत आणि त्यानंतरदेखील तोंडातून ब्र काढायचा नाही हे कातडीबचाऊ धोरण मराठी माणसाला महागात पडणार आहे. उगाच सभ्यतेच्या अतिटोकाच्या धारणा ज्या की सहसा मुखवटाम्हणून भ्याडपणा लपविण्यासाठी अंगिकारल्या जातात, त्या जरा बाजूला ठेवून प्रॅक्टीकल विचार करण्याची गरज आहे असे मला वाटते.

हे माझे वैयक्तिक मत असून यातले बरेचसे दुर्गुण मराठी माणूस असल्यामुळे माझ्यातही असू शकतील. पण मी मराठी माणसाशी तो कुठेही असला तरी, त्याला आवडत नसले तरी मराठीतच बोलतो. सार्वजनिक ठिकाणी मराठीतच बोलतो आणि शक्यतो मराठी माणसाच्या दुकानातूनच (तो मराठी असल्यामुळे कितीही उध्दट आणि सौजन्यहीन असला तरी) जीवनावश्यक वस्तू विकत घेतो. असे करण्याला पर्याय आहे असे मला वाटत नाही.

--समीर