वा मीराताई!
आपण छायाताईंना दिलेले उत्तर आणि त्यायोगे केलेली समस्यापूर्ती छानच आहे! मृदुलादेवी म्हणतात त्याप्रमाणे आपली व छायाताईंची जुगलबंदी खरेच छान रंगली आहे.
अक्षरगणवृतात दोन लघु अक्षरांचा गुरु होत नाही. तरी हे चालीत कसे म्हणता येते? प्रस्तुत ओळीसाठी असेही कोणी म्हणेल की कव चा उच्चार आपण कौ असा करत आहोत म्हणून तो गुरु झाला. परंतु क व ऐवजी कोणतीही दोन लघु अक्षरे घेतली तरी चालीत म्हणता येत आहे.
मीराताई,
आपली शंका रास्तच आहे. आमच्या मते गुरूऐवजी दोन लघ्वक्षरे घेऊन काही चालींत म्हणता येऊ शकते. परंतु त्याच वृत्ताच्या इतर काही चालींत ते म्हणता येईलच असे नाही. आपली ओळ आम्ही मंगलाष्टकाच्या चालीत म्हणून बघितली. (ह्या चालीत गुरुजी बहुतेक सर्व गुरू अक्षरे लांबवून म्हणतात असे वाटते.) तसे म्हणताना 'कव' म्हणणे शक्य झाले नाही. 'कौ'च म्हणावे लागले.
तेंव्हा चाल सैल असेल तर दोन लघ्वक्षरे चालू शकतील परंतु चाल 'घट्ट' असेल तर मात्र गुरूच्या ज़ागी गुरूच असावा असे वाटते. चू भू द्या घ्या.
आपला
(विश्लेषक) प्रवासी