माणसाने शाकाहार करावा की मांसाहार हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या मते 'प्राण्यांची हत्या होऊ नये म्हणून आम्ही मांसाहार करत नाही' हे शाकाहारी माणसाचे मत मला खोटे वाटते. आपल्याला जे आवडत नाही ते आपण खात नाही हे मान्य करायची लाज का वाटावी? त्याऐवजी अशी धादांत कारणे देऊ नयेत. खरे म्हणजे जे मांसाहार करत नाहीत त्यांनी एकतर मांसाहाराची चवच घेतलेली नसते किंवा त्यांना त्याची चव रुचलेली नसते. त्याला उगीचच असे आध्यात्मिक कारण देऊन ही माणसे आपल्या शाकाहाराचे समर्थन करतात. 'मला नाही रुचत म्हणून मी नाही खात' असे म्हणण्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नाही.
मांसाहारासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोगात येणारे प्राणी म्हणजे मासे, कोंबडी, डुक्कर, गायी-याक-म्हशी. ज्याप्रमाणे धान्याची शेती केली जाते त्याप्रमाणे या प्राण्यांचीही केवळ आहारासाठी पैदास केली जाते. त्यामुळे मांसाहारामुळे निसर्गाचा समतोलही बिघडत नाही.
जिभेचे चोचले पुरवण्याचा विषय आलाच आहे म्हणून सांगतो, आपल्या शरीराला लोह आणि प्रथिने आवश्यक असतात आणि शाकाहारातून आवश्यक तेवढी मिळत नाहीत. यासाठी प्रणिज पदार्थ आवश्यक असतात, जसे दूध, अंडी आणि मांसाहार. मासे खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण कमी असते. तसेच बाळंतपणात मांसाहार करणाऱ्या महिलांना नैसर्गिक प्रसूतीला कमी त्रास होतो आणि नवजात बालकाची तब्येतही सुदृढ असते. अशा महिलांचे बाळंतपणानंतर पोटही सुटत नाही. या गोष्टी वैद्यकीय शास्त्राने सिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे मांसाहार हा केवळा चवीसाठी असतो हे मत साफ चूक आहे. मांसाहारही तेवढाच आवश्यक आहे जेवढा शाकाहार आहे.
--ध्रुव.