बंधुराज,
छान सदर दिलेत - निर्भेळ व मनसोक्त प्रतिसाद देण्यास !
लहानपणीचा मार खाल्लेला आठवत नाही असे होणेच शक्य नाही !!!

वडिलांची सायकल फिरवली म्हणून- तर कधी त्यांच्या कार्यालयातली पट्टी वापरली म्हणून -
कधी आजोबांचे दात (कवळी)लपवले म्हणून- तर कधी आजीचा कंगवा तोडला म्हणून...

शाळेत बसलेला मार, मोठ्या बहिणी घरी येऊन चुगली करीत, म्हणून माहीत व्हायचा! मग शाळेत मार खाल्ला म्हणून आई बदडायची. संध्याकाळी वडील ऑफिसमधून आले की पहिले पाढे पंचावन्न !
एका चुकी साठी ३/३ वेळा मार खाणे नित्य नियमाचे होते. 

आठवीत असताना जरा शिंगे फुटली होती. त्यात चुगलखोर मोठी बहिण ११वीला म्हणजे कॉलेजला गेली त्यामुळे फावले ! एकदा शाळेला दांडी मारून गेलो सिनेमा टाकायला.... ७/८ उडाणट्प्पू होतो आम्ही एकत्र. टॉकीजवर जाऊन बघतो तर काय शाळेतली बरीच पोरे जमा झालेली... मग काय दे धमाल - कसे कुणास ठाऊक वसंत टॉकीज वाल्याने बहुतेक शाळेत फोन करून हेडमास्तरला बोलवून घेतला.... दरवाज्यावर शिक्षकांना उभे करून सिनेमा सुटल्यावर सर्वांना पकडले ! आमची वरात वसंत टॉकीज ते के. नारखेडे स्कुल अशी चांगली मिरवत नेली - मग काय....
तो आठवडा शाळेत मान वरं करायचीही हिम्मत झालेली नव्हती अस्मादिकांची !  

शाळेत ज्या पोराशी भांडण व्हायचे त्याच्या पुढे बसणाऱ्या पोराच्या शर्टावर काहीही करून शाई शिंपडायचो - मार कोण खाणार ?

मित्रांशी मारामाऱ्या सतत होत. एकदा विटीदांडूवरून गल्लीत १६जणांची आपापसात जुंपली - हा त्याला बडवतोय... तर तो दुसऱ्याला मारतोय... तर दुसरा तिसऱ्याला ! अर्धा तास येथेच्छ धुमाकूळ घातल्यावर, सगळे भानावर आले तेंव्हा सगळ्यांचे पिताश्री /माताश्री आजूबाजूला उभे राहून स्वतःचा नंबर कधी लागतो व ह्या पोरांची पाठ शेकायला कधी मिळते ह्याचीच वाट पाहतं होते.

गोट्या खेळलेले घरी आवडत नसे- म्हणून चोरून गोट्या खेळाव्या लागत.
एकदा वीस पावली की काही तरी खेळत होतो. मी खाली उकिडवा (संडासाला बसतात तसे !) बसलेलो... मागून आलं कोणीतरी, आणी फाडकन दिली मानेवर चपराक !
"मारणाऱ्याच्या ***  ** !" बोलून तर मोकळा झालो; मागे वळून बघतो तर.... काका उभे होते ! 
त्या दिवशी टेनिस चा बॉल झाला माझा - पिताश्री एका बाजूने विजय अमृतराज बनले तर काकाश्री आनंद अमृतराज ! 

मार का व कसा खाल्लेला आहे, हे लिहायला सुरुवात केली तर कथांसारखे भाग पाडून लिहावे लागेल.......
असो, बालपणीचा काळ सुखाचा हेच मात्र खरे !