मनुष्याला एखाद्या वनस्पतीशी वा प्राण्याशी भावनिक संबंध जोडता येत असतील तर त्याला ते खाणे नकोसे वाटते. त्यामुळे सामान्यतः माणसे कुत्रे, मांजरे खात नाहीत (अपवाद सोडा). डॉल्फिनलाही जपान सोडल्यास इतर जागी खाल्ले जात नाही. कोंबडी, मासे, अन्य खाद्य पक्षी, वनस्पती ह्या तितक्या बुध्दिमान वाटत नाहीत म्हणून त्या खाल्ल्या जात असाव्यात. नाहीतर, मटकी वा मूग भिजत घालणे, त्याला मोड आल्यावर ते शिजवून खाणे म्हणजे भ्रूणहत्येसारखे क्रूर नाही का?
दृष्टीआड सृष्टी हा नियमही इथे लागू होईल. माझ्या घरात एखादी शेळी पाळली असेल आणि अनेक महिने वा वर्षे ती तिथे राहिली असेल तर मला तिला मारुन खाणे बरे वाटणार नाही. माझ्या घरात वाडवडिलांपासून एखादे मोठे झाड असेल तर ते पाडून त्याची लाकडे स्वैपाकाला वापरणे कदाचित नको वाटेल. मात्र विकतचे बोकडाचे मांस, सरपण तितके वावगे वाटत नाही.
ह्यामुळे दुसऱ्या माणसाला खाणे सहसा कुणी करत नाही.
एक प्रश्नः आरोग्याच्या दृष्टीने दूध, लोणी, तूप हे प्राणिजन्य पदार्थ मांसाप्रमाणे घातक नाहीत का? भारतातील शाकाहारी लोक असे पदार्थ वर्ज्य मानत नाहीत.