लेखन छन, माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण आहे. असे आणखी वाचायला आवडेल.
वरील पारिभाषिक शब्दांची यादी वाचून मनात आलेल्या काही शंका व सुचवण्या -
१. ऍक्युरेट साठी अचूक हा शब्द यथातथ्य पेक्षा अधिक मराठी आहे असे वाटते.
२. अचिव्हमेंट साठी श्रेय हा शब्द मला योग्य वाटला नाही. श्रेय हे क्रेडिट या अर्थी जास्त योग्य आहे. अचिव्हमेंट साठी मिळकत हा शब्द जास्त योग्य वाटतो?
३. बार टाईप इंडिकेटर साठी दंडदर्शकापेक्षा दंडाकृतीदर्शक म्हणावे. अन्यथा दंड दाखविणारा असाही दंडदर्शकाचा अर्थ होतो.
४. कंटिन्युअस - अविरत हा शब्द माझ्यामते केवळ कालसातत्य दर्शवितो. त्यामुळे कंटिन्युअस चे सामान्यीकरण करायचे झाल्यास अखंड वा सलग हे शब्द वापरावे - ज्यातून काल आणि स्थान अशा दोन्हीतील सातत्य दर्शविता येईल.
५. माहितीसाठी इंफर्मेशन हा शब्द असल्याने डाटासाठी नोंदी वा नोंदसाठा हा शब्द कसा वाटतो?
६. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स हे शब्द मराठीत रूढ झाले आहेत. माझ्यामते मराठी माध्यमाच्या शास्त्राच्या पुस्तकांमध्ये तसे उल्लेख असतात. वीज करणारा ह्या अर्थी वीजक हा शब्द इलेक्ट्रॉन साठी वापरला तरी विद्युधारा वाहताना धनप्रभाराच्या वहनाची दिशा गृहीत धरली जाते. म्हणून ही शंका.
७. एक्सर्पट्स साठीचा झलकी हा प्रतिशब्द पूर्ण हिंदी वाटतो.
८. फास्ट साठी केवळ दृत हा शब्द पुरावा, पुढे गती जोडले नाही तरी चालू शकेल असे वाटते.
९. फाईल हा शब्दही मराठीत रूढ झालेला आहे. तरीही मराठी शब्द वापरायचा झाल्यास पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीने रूढ केलेला धारिणी हा शब्द ही वापरता येईल.
१०. की बोर्ड साठी कळफलक हा शब्द माझ्यामते कुंजीपटापेक्षा जास्त प्रचलित आहे.
११. रेंज साठी पट्टी हा शब्द तितका योग्य वाटत नाही. आवाका हा शब्द जास्त योग्य वाटतो.
१२. रिऍलिटी म्हणजे तथ्यापेक्षा वास्तव. प्रत्यक्षात अस्तित्वात असणारी गोष्ट, त्यात तथ्य असेलच असे नाही.
१३. स्केलसाठी मी मापनश्रेणी हा शब्द वापरते.
१४.टेंपरेचर व प्रेशस इंडिकेटर साठी तापदर्शक व दाबदर्शक असे शब्द योग्य अर्थ दर्शवतील असे वाटते. ताप मोजणारा तापमापक वेगळा व ते मापन आकड्यांच्या स्वरूपात डिजिटल फलक दर्शवितो म्हणून तो दर्शक. त्यामुळे मापक हा दर्शक असू शकतो, पण दर्शक हा मापक असेलच असे नाही.
माझ्या शंका व सुचवण्यांबद्दल तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल.