शाकाहार अथवा मांसाहार ज्याला जे पटेल/आवडेल ते करण्याचा पूर्ण अधिकार
आहे. दोन्ही बाजूंच्या लोकांनी आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये
असे वाटते.
माझ्या मते 'प्राण्यांची हत्या होऊ नये म्हणून आम्ही मांसाहार करत नाही' हे शाकाहारी माणसाचे मत मला खोटे वाटते.
हे मत का खोटे वाटते ते सांगितले नाही. सांगायची गरजही नाही खोटे "वाटते" यात सगळे आले. "त्यांना" खरे "वाटत" असावे. असो.
आपल्याला जे आवडत नाही ते आपण खात नाही हे मान्य
करायची लाज का वाटावी? त्याऐवजी अशी धादांत कारणे देऊ नयेत. खरे म्हणजे जे
मांसाहार करत नाहीत त्यांनी एकतर मांसाहाराची चवच घेतलेली नसते किंवा
त्यांना त्याची चव रुचलेली नसते
जरा विरोधाभास आहे या वाक्यांमध्ये, काही लोकांनी मांसाहाराची चवच घेतलेली
नसते असे म्हटले आहे, त्यामुळे "आवडत नाही म्हणून खात नाही" हे त्यांना
लागू होणार नाही. "चव न रुचलेले" लोक एकूण शाकाहारी लोकसंख्येच्या मानाने
किती असावेत बरे?
त्याला उगीचच असे आध्यात्मिक कारण देऊन ही माणसे
आपल्या शाकाहाराचे समर्थन करतात. 'मला नाही रुचत म्हणून मी नाही खात' असे
म्हणण्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नाही.
वर म्हटल्याप्रमाणे 'मला नाही रुचत म्हणून मी नाही खात' हे ज्या लोकांच्या
बाबतीत खरे नाही त्यांनी असे का बरे म्हणावे? :) आध्यात्मिक कारणाने जर
काही लोक मांसाहार करत नसतील तर त्यात गैर काय? प्रत्येकाला कशावर विश्वास
ठेवायचा याचे स्वातंत्र्य आहे.
"तुम्ही मांसाहार का करता?" असा प्रश्न विचारला तर त्याचे खरे उत्तर "मला
आवडले/ते" असे असावे. मी प्रोटिन्स आणि लोह मिळवण्यासाठी खातो चवीशी काही
देणेघेणे नाही असे जे म्हणतात त्यांनी आवश्यक तितकेच खाल्ले पाहिजे नाहीतर
हा ढोंगीपणा होईल.
बऱ्याचश्या (सर्व नाही) मांसाहारी लोकांना एक सवय असते, आपल्या शाकाहारी
मित्राला/मैत्रिणीला विचारायचे तू का "खात" नाहीस, आणि काही कारण ऐकले की
ते कसे चुकीचे आहे हे सांगायचा प्रयत्न करायचा किंवा भाज्या आणि मांस
सारखेच आहेत हे सिद्ध करायचा प्रयत्न करायचा. याचे कारण काय असावे बरे?
बऱ्याच लोकांना (साऱ्यांना नाही) आपण मांसाहार करून काहीतरी चुकीचे करतोय
अशी आंतरिक टोचण असते (ती सामाजिक कारणांमुळे असेल) त्याचे समर्थन करून ती
टोचण कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न काहीजण (सर्व नाही :) करत असतात. हेच
काही (सर्व नाही) शाकाहारी लोकांनाही लागू आहे,
थोडक्यात दुसऱ्या व्यक्तींच्या मतस्वातंत्र्याचा आदर करावा आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जगू द्यावे.