वरदा, नमस्कार. प्रतिसादाखातर हार्दिक धन्यवाद. तांत्रिक शब्दसंग्रह सशक्त करण्यात नैसर्गिक रुची असणाऱ्या लोकांनी अशा प्रयत्नांत भाग घेऊन योगदान देण्याची खरोखरीच गरज आहे. म्हणून मी तुमचे स्वागत करतो. विस्ताराने आणि संपूर्ण वाचून अभिप्राय नोंदविल्याखातर पुन्हा एकदा धन्यवाद. त्यावर मी माझा प्रतिसाद इथे देत आहे.

१. ऍक्युरेट साठी अचूक हा शब्द यथातथ्य पेक्षा अधिक मराठी आहे असे वाटते. बरोबर आहे. अचूक अधिक योग्य वाटतो.

२. अचिव्हमेंट साठी श्रेय हा शब्द मला योग्य वाटला नाही. श्रेय हे क्रेडिट या अर्थी जास्त योग्य आहे. अचिव्हमेंट साठी मिळकत हा शब्द जास्त योग्य वाटतो? अचिव्हमेंट साठी यांहून निराळा असा 'सिद्धी' हा शब्द अधिक योग्य वाटतो.

३. बार टाईप इंडिकेटर साठी दंडदर्शकापेक्षा दंडाकृतीदर्शक म्हणावे. अन्यथा दंड दाखविणारा असाही दंडदर्शकाचा अर्थ होतो. कबूल आहे.

४. कंटिन्युअस - अविरत हा शब्द माझ्यामते केवळ कालसातत्य दर्शवितो. त्यामुळे कंटिन्युअस चे सामान्यीकरण करायचे झाल्यास अखंड वा सलग हे शब्द वापरावे - ज्यातून काल आणि स्थान अशा दोन्हीतील सातत्य दर्शविता येईल. अस्खलित असाही शब्द वापरता येईल.

५. माहितीसाठी इंफर्मेशन हा शब्द असल्याने डाटासाठी नोंदी वा नोंदसाठा हा शब्द कसा वाटतो? इंफर्मेशनसाठी माहिती व डाटासाठी नोंद हे शब्द वापरावेत ह्यासाठी मी सहमत आहे.

६. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स हे शब्द मराठीत रूढ झाले आहेत. माझ्यामते मराठी माध्यमाच्या शास्त्राच्या पुस्तकांमध्ये तसे उल्लेख असतात. वीज करणारा ह्या अर्थी वीजक हा शब्द इलेक्ट्रॉन साठी वापरला तरी विद्युधारा वाहताना धनप्रभाराच्या वहनाची दिशा गृहीत धरली जाते. म्हणून ही शंका. ही कारणे नवे अर्थवाही शब्द स्वीकारण्यास कुठलाच अडथळा करीत नाहीत. त्यासाठी ती अपुरी आहेत. इलेक्ट्रॉन=ऋणाणू, वीजक; प्रोटॉन=धणाणू; तसेच न्यूट्रॉन=विरक्ताणू इत्यादी नवे शब्द स्वीकारार्ह, योग्य, सोपे इत्यादी आहेत का ह्यावर कृपया मत व्यक्त करावे. नवे शब्द चांगले असतील तर रूढ केल्या जाऊ शकतात. आणि पुस्तकातही येऊ शकतात.

७. एक्सर्पट्स साठीचा झलकी हा प्रतिशब्द पूर्ण हिंदी वाटतो. कबूल आहे. ह्या शब्दाच्या पर्यायासाठी तुमचा काही दुसरा प्रस्ताव आहे काय? वानगी कसा वाटतो?

८. फास्ट साठी केवळ दृत हा शब्द पुरावा, पुढे गती जोडले नाही तरी चालू शकेल असे वाटते. कबूल आहे.

९. फाईल हा शब्दही मराठीत रूढ झालेला आहे. तरीही मराठी शब्द वापरायचा झाल्यास पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीने रूढ केलेला धारिणी हा शब्द ही वापरता येईल. माझ्या मते धारिणी व संचिका हे दोन्ही शब्द स्वीकारार्ह संस्कृतोद्भव शब्द आहेत. मात्र हिंदीत वापरल्या जाणारे शब्दच मराठीत वापरल्यास त्याचा मराठी भाषेस अंतिमतः फायदा होईल असे मला वाटते. म्हणून मी संचिका हा शब्द वापरला. याबाबत तुम्हाला काय वाटते?

१०. की बोर्ड साठी कळफलक हा शब्द माझ्यामते कुंजीपटापेक्षा जास्त प्रचलित आहे. इथेही माझी निवड हिंदीत वापरलेल्या शब्दास प्राधान्य देऊनच मी केलेली आहे. तुम्हाला असे प्राधान्य देण्याबाबत काय वाटते?

११. रेंज साठी पट्टी हा शब्द तितका योग्य वाटत नाही. आवाका हा शब्द जास्त योग्य वाटतो. खरे आहे. कबूल आहे.

१२. रिऍलिटी म्हणजे तथ्यापेक्षा वास्तव. प्रत्यक्षात अस्तित्वात असणारी गोष्ट, त्यात तथ्य असेलच असे नाही. हे कळले नाही. मला वाटते वास्तव म्हणजेच तथ्य. मात्र रिऍलिटी म्हणजे वास्तविकता हा शब्द वापरण्यास मी तयार आहे.

१३. स्केलसाठी मी मापनश्रेणी हा शब्द वापरते. तो मलाही योग्यच वाटतो मीही वापरेन. सर्वांनीच वापरावा.

१४.टेंपरेचर व प्रेशस इंडिकेटर साठी तापदर्शक व दाबदर्शक असे शब्द योग्य अर्थ दर्शवतील असे वाटते. ताप मोजणारा तापमापक वेगळा व ते मापन आकड्यांच्या स्वरूपात डिजिटल फलक दर्शवितो म्हणून तो दर्शक. त्यामुळे मापक हा दर्शक असू शकतो, पण दर्शक हा मापक असेलच असे नाही. तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. ह्यावर मी पूर्णतः सहमत आहे.

तुमच्या अभिप्रायांवरील माझे मत मी व्यक्त केले आहे. इतरांच्या मतांची, माहितीचीही ह्यात भर पडेल. आणि शब्दसंग्रह सशक्त होईल अशी सबळ आशा आहे.

तुमच्या, तसेच मीरा फाटक ह्यांच्याही लेखांचे ह्यादृष्टीने विस्ताराने वाचन, आकलन मला करायचे आहे. त्यामध्ये कितीतरी सुंदर नवे शब्द मला आढळलेले आहेत. मात्र भारतात महाजालावर वावरण्यास अत्यंत अपुरा वेळ मिळतो, विद्युतपुरवठा विस्कळीत व अपुरा असतो आणि महाजाल संबंध स्थिर व अस्खलित राहत नाही ह्या अडचणींमुळे आम्ही महाजालावर मनसोक्त वावरू शकत नाही. त्यामुळे आमच्या अभिप्राय न देण्याचे विपरित अर्थही निघू शकतात. मात्र आमची भावनाही इतर सर्वांप्रमाणेच सर्वार्थसाधनाचीच आहे ह्यात शंका नसावी.

हे सर्व शब्द एकत्र करून सर्वांना स्वीकारार्ह तांत्रिक शब्दांचा सर्वव्यापी, विशाल शब्दकोश निर्माण करावा असा मानस आहे. याखातर आपल्याला काय करता येईल?

मी सुचविलेल्या इतरही अनेक शब्दांबाबत जमेल तसा अभिप्राय जरूर व्यक्त करावा ही विनंती.