घोडबंदर रोड वर (बोरिवली ते ठाणे) हल्ली जेथे टोल नाका आहे त्याच्या डाव्या हाताला उपहारगृहांची व खानावळींची रांग आहे. त्यातली 'सुरेखा' ही खानावळ झकास !
एकट्या दुकट्याने जायची सोय नाही..... कारण १ प्लेट अमुक तमुक हा प्रकार येथे नाही. पूर्ण बर्ड मागवावा लागतो. फक्त चिकन मिळते. भटार खान्यातून सरळ पितळेचे भांडे टेबलावर आणून ठेवतात. वाढायची वगैरे फॉर्मॅलिटीज विसरा..... मागच्या बाजूला डोकावले तर बायका पोळपाट लाटणी घेऊन जमीनीवर फतकल मारून पोळ्या लाटत बसलेल्या दिसतील.... मऊसूत गरम पोळ्या व समोरचे भांड्यातले गरम चविष्ट चिकन - खाणाऱ्याचा अंदाजच चुकवेल इतके जबरदस्त !
बाहेर गाड्या बघाल तर स्कोडा- मर्सीडिज पासून - दुचाकी पर्यंत सगळ्याच !
पिण्याची नाटक इकडे चालवून घेत नाहीत त्यामुळे बायका मंडळींना घेऊन जाण्यात धोका नाही. किंमती थोड्या जास्त आहेत पण त्यामुळे सिलेक्टेड क्राउड येतो व पिण्यातले दर्दी फारसे फिरकत नाहीत ही आनंदाची बाब ! खास बाब म्हणजे दिवसाही गर्दी तितकीच असते !