• मराठी चित्रपटांची गुणवत्ता आणि प्रेक्षकसंख्या खरेच वाढत आहे काय?

    मराठी चित्रपटांची गुणवत्ता खचितच उल्लेखनीयरित्या उंचावली आहे. प्रेक्षकसंख्येबद्दल अधिकारवाणीने काही भाष्य करू शकत नाही.

  • गेल्या वर्षभरात आपण स्वतः चित्रपटगृहात ज़ाऊन किमान एक मराठी चित्रपट पाहिलात काय?

    नाही.

    मी चित्रपटगृहात सर्वात शेवटचे असे पाहिलेले चित्रपट :
    मराठी : माहेरची साडी
    हिंदी : लगान
    इंग्लिश : हँड्स ऑफ स्टील !!!

    मला स्वतःला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघायला खूप आवडायचे. 'एका वर्षात एक' या दराने आमचं कुटुंब चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघायचंही !  परंतु पुढेपुढे काही सदस्य त्यांच्या तब्येतीच्या कारणांनी यायचं नको म्हणायला लागले. "तुला पैसे देतो, तू जाऊन ये." अशी परवानगी मिळता नाचतनाचत चित्रपट बघायला गेलेली मी, "खूपच छान चित्रपट होता. तुम्ही बघायलाच हवा होतात." अशी हुरहुर घेऊन परत यायचे. मी आनंद उपभोगायचा आणि घरातल्या काहींना तब्येतीच्या अडचणीमुळे तो आनंद उपभोगता न आल्याने केवळ माझ्या तोंडून चित्रपटकथा ऐकावी लागावी, यात कुठेतरी खूप सलायचं मनात ( त्यांनी तसं कुठेही भासवून दिलेलं नसूनही ). यावर अधिकृत सीडींचा उपाय गवसताच मीही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहाणं सोडून देऊन घरच्यांसोबत, दोस्तांसोबत काँप्युटर अथवा सीडीप्लेअरवर चित्रपट,नाटकं यांचा आनंद उपभोगायला सुरूवात केली. मी माझ्या आवडलेल्या चित्रपटांच्या, नाटकांच्या अधिकृत व्हीसीडी/डीव्हीडी आणि गाण्यांच्या सीडी माझ्या संग्रही जमा करून ठेवते ( हा आता छंदच झाला आहे ). न बघितलेल्या चित्रपटाबद्दल आवडनिवड नक्की करायला नविन चित्रपट लागता हटकून बघायला जाणाऱ्या समविचारी दोस्तांच्या, नातलगांच्या प्रतिक्रिया आणि विविध माध्यमांतून मिळणाऱ्या प्रतिक्रियांचा वापर करते, माझ्या अर्थनियोजनाप्रमाणे सीडीकरता पैसे बाजूला काढणे शक्य झाले आणि अपेक्षित चित्रपट/नाटकाची अधिकृत सीडी बाजारात उपलब्ध असल्यास ती विकत घेते. सर्व मराठी चित्रपटांच्या, नाटकांच्या अशा अधिकृत सीडी उपलब्ध होत नाहीत ( पायरेटेड असतात ! ) हे आमचं ( माझं आणि रंगमंदिरात/चित्रपटगृहात जाऊन कलाकृती बघण्यास हतबल माझ्या आप्तांचं ) खूप मोठं दुर्दैव आहे. 

    अधिकृत सीडीच विकत घेण्यामागे असे नाटक/चित्रपट बघायला आम्हाला आवडत आहे, अशा कलाकृतींना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी म्हणून ही आमच्यातर्फे फुल न फुलाची पाकळी, अशी भूमिका असते. अधिकृत सीडींच्या विक्रीतून मिळणारे पैसे नाटक/चित्रपटनिर्मात्यांना मिळतात, अशी माझी समजूत आहे. ती खरी आहे का, याबद्दल कोणी काही सांगितले तर बरे होईल.