सामान्यतः मांसाहारात वापरल्या जाणाऱ्या जीवांना डोके, नाक, कान, डोळे, हात, पाय, मेंदू, हृदय, मज्जासंस्था, जठर, आतडे असे अवयव असतात. हे किंवा असे अवयव मानवालाही असतात, कदाचित त्यामुळेच माणसे मांसाहार करायला कचरत असावीत असे वाटते.
(आता यातल्या हात/पाय यावर पक्षी भक्षक आणि जलचरभक्षक सहज आक्षेप घेऊ शकतात. पण आठवी-नववीत जीवशास्त्राचा अभ्यास करणारा कोणताही विद्यार्थी त्यांचे तितक्याच सहजतेने शंकानिरसन करू शकेल असे वाटते.)
सामान्यतः शाकाहारात वापरल्या जाणाऱ्या वनस्पती भक्षण, श्वसन, पचन, उत्सर्जन/विसर्जन या नैसर्गिक क्रिया जरूर करतात, पण ते त्या मानवाला असतात त्या प्रकारच्या अवयवांतून करत नाहीत.
"जीवो जीवश्य जीवनम्" हे नैसर्गिक सत्य आहे. ते शाकाहारी अथवा मिश्राहारी (आपण सामान्यतः ज्यांना मांसाहारी म्हणतो ते लोक संपूर्णतः मांसाहारी नसतात असे वाटते) लोकांकडून पाळले जातेच.
फलाहारी लोकच काय ते दुसऱ्याचा जीव घेत नसावेत असे वाटते. कारण झाडाला एकदा फळ लागले की बीजवहनाशिवाय झाडाला त्या फळाचा काही उपयोग नसतो. आणि ते फळ इतर सजीवांकडून खाल्ले जाणे अपेक्षितच असते, तसेच त्यात जीवही नसतो. अर्थात १००% फलाहारी अथवा मांसाहारी मानव माझ्या पाहण्यात नाही.