अदितीताईंचा मुद्दा पूर्णपणे बरोबर किंवा पूर्णपणे चूक असे मी म्हणणार नाही. या मुद्द्याला दोन बाजू आहेत. केवळ नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीकोनातून पाहिले तर अदितीताईंचा मुद्दा पूर्ण मान्य होऊ शकतो. मात्र विकास आणि नैसर्गिक सौंदर्य यांची सांगड घालणे (अशक्य नसले तरी) कठीण मात्र नक्कीच आहे. मी आयुष्याची ४ वर्षे पुण्यात काढली आहेत आणि मी पाहिलेले पुण्याचे नैसर्गिक सौंदर्य आज नाही हे जरी खरे असले, तरी मी न पाहिलेला विकास आज तिकडे आहे हे सुद्धा नाकारता येत नाही. सध्या पेशवे उद्यानाची झालेली अवदशा(!?) पाहून वाईट जरूर वाटते, पण तेथे नव्याने उभारलेल्या "ऊर्जा" उद्यानाच्या महत्त्वाकडे/योगदानाकडे कानाडोळा करून चालणार नाही. पुण्याच्या सीमांवर वसलेली वारजे, हिंजवडी, मगरपट्टा वगैरे ठिकाणे विकसित होत आहेत हे खरे; पण ऍमडॉक्स, इन्फोसिस सारख्या उद्योगांनीसुद्धा निसर्गाचा समतोल राखण्याकडे विशेष लक्ष पुरवले आहे हे आपण का लक्षात घेऊ नये? (त्यांनी विकसित केलेल्या आवारांवरून, वृक्षलागवडीवरून, बागा आणि हिरवळीची ठिकाणे आणि एकूण परिसरावरून याची कल्पना यावी) त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य आणि विकास यांचा समतोल राखता येईल जसे ठराविक जागा नैसर्गिक सुशोभिकरणासाठी राखीव ठेवणे, प्रदूषणमुक्त राखीव परिसर घोषित करणे इत्यादी. आज जगभरातील अनेक व्यस्त शहरांमध्ये हेच प्रयोग चालू आहेत आणि आपणही त्याचा एक भाग असण्याला हरकत नसावी. नैसर्गिक सौंदर्य आणि विकास यांच्यातील कोणत्यातरी एका गोष्टीसाठी हटवादीपणाचे धोरण राबवण्यापेक्षा दोन्हींचा सुवर्णमध्य गाठण्याच्या दृष्टीनं पावलं उचलणं अधिक तर्कसंगत आणि विवेकी वाटतं.
विकासाच्या बाबतीत त्यानं मांडलेल्या मताशी सहमत आहे.