अदिती,
अगदी मनातलं बोललीस. खरंच गं आता पर्वतीचा कळसही दिसेनासा झालाय. पूर्वी उठल्या उठल्या पर्वती पाहायची सवय होती. रोषणाई केलेली पर्वती किती सुंदर दिसायची !!
संयुक्ता,
पुण्याचे केवळ नैसर्गिक नुकसान झाले नाहीये. सध्याची गर्दी , गोंगाट, प्रदूषण यामुळे प्रत्येकाच्या आरोग्यालाही नुकसान पोहोचत आहे. तू म्हणतेस 'मी न पाहिलेला विकास पुण्यात झाला आहे' म्हणजे काय ? जे तू पाहिलंसंच नाहीस ते तू सुधारले आहे की बिघडले आहे हे कसे ठरविलेस ? आधीचे अगदी गेल्या १०-१५ वर्षांपूर्वी पर्यंत गाव म्हणजे नदीच्या अलीकडचा, लकडी पुलापर्यंतचा फारतर डेक्कन पर्यंतचा भाग असा समज होता. साधारण ९४ पासून पुणे बेसुमार, वाट्टेल तसे वाढत गेले. पोटभर अगदी गळ्यापर्यंत येईल एव्हढे जेवल्यानंतर कोणी जेवण्याचा प्रयत्न केला तर कशी परिस्थिती होईल तशी परिस्थिती पुण्यात होत आहे. मुळात इतक्या माणसांना पोसण्याची पुण्याची क्षमताच नाहीये. लक्ष्मी रस्ता वाढवून कुठे आणि कसा वाढवणार ?? गर्दीचा ओघ कमी होत नाही आणि त्यामुळे मूलभूत गोष्टींचा तुटवडा वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी पुरे पडेल अशी पाणी शुद्धीकरण व्यवस्था, मलनिस्सारण व्यवस्था पुण्यात नाही. आकर्षक इमारती आणि अलिशान घरा-हॉटेलांचा उपयोग काय ??
तू म्हणतेस तो विकास म्हणजे काय ? मोठ्या-मोठ्या आकर्षक इमारती झाल्या म्हणजे विकास ? की मुठेचे पात्र दिवसागणिक लहान होत आहे तो विकास ? मुठेच्या पात्रात दर २-४ किमी वर पूल बांधून पाण्याचा प्रवाह रोखणे आणि पाणी प्रवाही राहण्यासाठी कुठलीच पर्यायी व्यवस्था न करणे म्हणजे विकास ? कात्रज ते शनिवारवाडा जलमार्गावरील उच्छ्वास ठिकठिकाणी बुजविणे म्हणजे विकास?? गजबजलेला आणि खूप मोठा झालेला सिंहगड रस्ता म्हणजे विकास (त्याचे दुष्परिणाम लोक आता प्रचंड उकाडा आणि पाणी टंचाई मार्गे भोगत आहेत) ? पुण्याभोवताल चौफेर असणाऱ्या टेकड्यांवरची बांधकामे म्हणजे विकास ? सध्या पुण्यात असलेल्या आणि येऊ घातलेल्या देशी/विदेशी कंपन्या म्हणजे विकास (कदाचित हो कारण नोकरीची संधी पण इतक्या कंपन्या येण्यामुळे झालेले दुष्परिणाम??) ? माणशी एक याप्रमाणे घरात असणारे वाहन ? मोठ्या हॉटेलात/ दुकानात/ मल्टिप्लेक्स मधे जाण्याची ऐपत म्हणजे विकास ? एका गल्लीत २-३ याप्रमाणे असणारी गणपती मंडळे म्हणजे विकास ? खड्ड्यांच्या मधे अधून मधून दिसणारा रस्ता म्हणजे विकास ? शहरात वाढणारी शाळा-कॉलेजे आणि त्यांची मनमानी म्हणजे विकास ? शिक्षणाचे व्यापारीकरण म्हणजे विकास ? आई-बापाच्या पैशावर सीसीडी (कॅफे कॉफी डे ) किंवा बरिस्ता मधे पडिक असणारी मुले म्हणजे विकास ? फर्गसन रस्त्यावरची तोकड्या कपड्यातील मद्यधुंद मुले-मुली म्हणजे विकास ? सिंहगडावरचे दारूच्या बाटल्या-प्लॅस्टीकचे ढीग म्हणजे विकास ? कित्येक वर्षात सर्विसिंग न केलेल्या पी एमटी म्हणजे विकास ?
बहुराष्ट्रीय कंपन्या वृक्षलागवडी करतात म्हणे.. त्यामागचे कारण काय ? एकतर त्यांच्या आवाराचे सुशोभीकरण किंवा आयएसओ १४००२ (आकडा नक्की माहीत नाही) साठीचा आटापिटा. कोणते वृक्ष लावतात हे लोक ? वड,पिंपळ,पांगारा,गावठी बाभूळ, हिरडा, बेहेडा, कडुनिंब, जांभूळ, रिठा, चिंच, करंज वगैरे किंवा औषधी/दुर्मिळ वनस्पती कोणती कंपनी लावते ?(लावत असल्यास त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडे. पुणेकरांचे असे काही गट आहेत जे टेकडी रक्षणाचे कार्य करतात. हे लोक टेकड्यांवर झाडे लावतात, पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन जातात आणि जाता येता रस्त्याच्या कडेच्या झाडांना किंवा टेकड्यांवरच्या झाडांना पाणी घालतात) किती कंपन्या कागद/पाणी/प्लॅस्टीक चा कमीत कमी वापर करतात (आमच्या कंपनीत काही दिवसांपूर्वी 'कागदी' कॉफी कप काढून टाकण्यात आले. सर्वांना कॉफी मग वाटण्यात आले. टॉयलेट मधले हात पुसण्यासाठीचे टिशू पेपर काढून टाकण्यात आले) ? किती कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या आवारात फिरण्यासाठी सायकल वापरण्याबद्दल किंवा जवळपास राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सायकल वापरण्यासाठी प्रोत्साहन देतात ?
गेल्या काही वर्षात पुण्यात अनेक चित्रपटगृहे/नाट्यगृहे झाली. सुसज्ज हॉस्पिटले झाली. नोकरीच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या. पण हे सर्व होताना पुण्याच्या नसानसा बुजविण्यात आल्या. अगदी पूर्वीच्या म्हणजे अदितीने ज्या चित्रांचा उल्लेख केला त्यावेळी पुण्यात ४-५ नद्या गावातून वाहत होत्या. मुळा, मुठा, सध्याचा आंबिल ओढा, आणखी २ ची नावे आठवत नाहीत. नदीचा आंबिल 'ओढा' झाला. तीच प्रक्रिया आता मुठेच्या बाबतीत चालू आहे.
मला नाही वाटत ५-१० वर्षांपुर्वीचे पुणे 'अविकसित' होते कारण त्यावेळी त्यावेळच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा बऱ्यापैकी पुरे पडत होत्या ज्या ठिकाणी मूलभूत सोयींचा अभाव होता तो तिथे अजूनही आहेच. शिवाय अभाव असण्याचा आवाकाही वाढला आहे. त्यामुळे 'पुण्याचा विकास ५-१० वर्षात झाला आहे' हे वाक्य मला पटतच नाही. फारतर पुणे बेडकीच्या पोटासारखे फुगू लागले आहे असे म्हणू या.
पण आपण सगळेच गप्पाबहाद्दर ! प्रत्यक्षात काय करणार आहोत ? पुण्यात येणाऱ्या लोकांना, मूलभूत गरजा भागविण्याइतकी क्षमता पुण्यात येईपर्यंत, थोपवू शकणार आहोत ? की रस्त्याच्या कडेला झाडे लावून त्यांना जपणार आहोत ?? मैदाने/बागा नष्ट करू नका म्हणून काही परिणामकारक चळवळ करणार आहोत ? कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी तरी सायकली वापरण्याची सक्ती करण्यासाठी प्राचार्यांकडे धरणे धरणार आहोत ? आपण स्वतः वाहनांचा कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न करणार आहोत ? की आपले 'स्टेटस' इतरांना दाखविण्यासाठी विकत घेतलेल्या महागड्या चारचाकी मधून फिरणे थांबविणार आहोत? टेकड्यांवर बांधकामे करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध प्रत्यक्ष कृती करणार आहोत ? रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदारांच्या बरोबर आपले कामधंदे सोडून उभे राहून रस्ता चांगला व्हावा म्हणून जातीने लक्ष घालणार आहोत ? खरेदीला जाताना न लाजता कापडी पिशवी घेऊन जाणार आहोत आणि विक्रेत्याने प्लॅस्टिक पिशवी दिल्यास ती नाकारणार आहोत ?
सुशोभीकरणासाठी जागा राखीव ठेवणे म्हणजे छान ताटलीमधे रंगीबेरंगी भाज्या सजवून पुढे केलेला हॅम-बर्गर आहे. दिसायला सुंदर पण पोषण मूल्य शून्य ! इतर शहरात टेकड्या नसतात. सुदैवाने आपल्याला चारही बाजूंनी टेकड्या लाभल्या आहेत. आपल्याला क्रिसमस ट्री सारखे परदेशातील हवामानाला योग्य, नाजूक सौंदर्य नको आहे. आपल्याला रांगडे सौंदर्य हवे आहे तरच पुणे श्वास घेऊ शकेल.
(प्रतिसाद जरा जास्तच लांबलचक झाल्याबद्दल माफ करा)