पुणे शहराचे पुणेपण हा माझ्या फार जिव्हारी लागणारा विषय आहे.

माझ्या वडिलांनी सांगितलेली एक हकीगत अशी. माझ्या वडिलांचे तेव्हा नुकते लग्न झाले होते आणि आमच्याकडे आमचे आजोबा (आईचे वडील) कोकणातून आलेले होते. ते शनिपारापाशी आल्यावर म्हणाले, "बापरे! केवढी ही गर्दी इथे!"......... ह्या गोष्टीला निदान साठ तरी वर्षे झाली असतील!

सांगण्याचा मुद्दा हा, की गर्दी वाढतच आहे! सांगितले तर आश्चर्य वाटेल, पण माझ्या लहानपणी शनिपाराकडून मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुतर्फा वाहतुकीत बस जात असे! त्यातही जिलब्या मारुती आता आहे त्याच्या ऐवजी जवळ जवळ रस्त्याच्या मध्ये होता! म्हणजे रस्ता निम्म्याहूनही जरासा अरुंदच  असेल!

पर्वती शेजारून जाणाऱ्या कालव्याचे दोन्ही किनारे तिरके होते आणि ते फरश्यांनी झाकलेले होते. त्याच्या एका कडेने फिरत जाऊन दुसऱ्या कडेने परत यायला मला फार आवडे.

आता तिथे जे मतदारसंघ दुतर्फा विकसित झालेले आहेत ते पाहता तिथे कुणी कधी फिरायला धजावत असेल हे पटणारही नाही.

ते सोडा. जवळ जवळ १९८१ पर्यंत रस्त्यावर प्रदूषण नव्हते असे म्हटले तरी चालेल. बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोड वर चक्कर मारायला काही वाटत नसे. बालगंधर्व पूल हे फिरायला जाण्याचे ठिकाण होते. 

माझ्या कल्पनेप्रमाणे नवनव्या कंपन्यांच्या दुचाक्या सहज मिळायला लागल्या, बांधकामांचा सुळसुळाट सुरू झाला आणि तीन चार वर्षात कसला तरी सूड घेतल्या सारखे सगळे चित्र बदलले.