पुण्याचा आधुनिक इतिहास पाहता ते 'सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे'. त्याचा थोडा पुढे जाऊन अर्थ बघितला तर सामान्यतः लोकांना स्वतःचे वाहन हवे अशी मनोवृत्ती.

वैयक्तिक वाहनांच्या बरोबरीने महानगरपालिकेने बसगाड्या चालू केल्या त्याही त्याच जुन्या रस्त्यांवर जागा व्यापू लागल्या. त्या बससेवेला कमी ग्राहकवर्ग मिळाल्याने, बससेवा नेहमी तोट्यातच राहिली.

त्याचा परिणाम बससेवेच्या कार्यक्षमतेवर झाला. त्यामुळे वैयक्तिक वाहने खरेदी करण्याकडे लोकांचा कल आणखी वाढला. सायकली जाऊन स्वयंचलित दुचाक्या आल्या. आता उच्चमध्यमवर्गीयांत चारचाकी गाड्यांची चलती आहे.

जुन्या शहराचीच वाढलेली लोकवस्ती, पानशेतच्या पुरानंतर सुरू झालेले पुणे 'गांवाचे' काँक्रिटीकरण, गांवात वाढलेली वाहतूक, रस्तारूंदीकरणासाठी अतिशय कमी जागा. नवीन उपनगरांच्या सुधारणेत आणि विस्तारात शहर व्यवस्थापच्या दूरदृष्टीचा अभाव. त्यामुळे रस्त्यांचा आकार वाहनांच्या समप्रमाणात वाढला नाही.

अकार्यक्षम सार्वजनिक बससेवा, स्वावलंबी (स्थानिक) प्रवासाची सवय, लोकलचा(रेल्वे) अभाव, बजाज-कायनेटीक-बँका यांनी एकत्रितपणे वाहने रस्त्यावर 'ओतायला' केलेली प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मदत, रस्त्यांचा न वाढलेला आकार या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे प्रचंड वाहतूक 'घनता' (ट्रॅफिक डेन्सिटी... प्रति किमी अंतरात एकाचवेळी किती गाड्या असे काहीसे परिमाण आहे).