सुखदाताई,
"तू म्हणतेस तो विकास म्हणजे काय ? मोठ्या-मोठ्या आकर्षक इमारती झाल्या म्हणजे विकास ? ..... सिंहगडावरचे दारूच्या बाटल्या-प्लॅस्टीकचे ढीग म्हणजे विकास ? कित्येक वर्षात सर्विसिंग न केलेल्या पी एमटी म्हणजे विकास ? "
--- छोटी शंका आली मनात, चू. भू. द्या. घ्या. माझ्या विकासाच्या संकल्पनेत "या" सगळ्याचा अंतर्भाव होतो किंवा मी म्हटलेला विकास = फक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांची, नोकरीच्या संध्यांची वाढ हा निष्कर्ष कुठल्या तर्कावर आधारीत आहे? हे सुद्धा स्पष्ट झाले असते तर आनंद वाटला असता. असो.
विकास = आरोग्य, स्वच्छता, पायाभूत सुविधांची परिपूर्णता इत्यादी हे मला अपेक्षित नाही असे नाही. मी जे लिहिले होते ते केवळ एक उदाहरण होते. माझ्या प्रतिसादातले नैसर्गिक सौंदर्य आणि विकासाबाबतचे शेवटचे वाक्य (जाणूनबुजून/अजाणतेपणी वगैरे म्हणून चर्चेला विवादाची दिशा देणार नाही मी!!) दुर्लक्षित झाले/राहिले असून, ते विकासाच्या सगळ्याच अंगांना लागू पडते हा मुद्दा नाकारता येईलसे वाटत नाही. मी मांडलेला नैसर्गिक सौंदर्याचा मुद्दा हा केवळ एक भाग/उदाहरण झाला/झाले (आणि किंबहुना तो एकच भाग मी मांडल्याने मला अपेक्षित असलेला विकास म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या, टोलेजंग इमारती, मल्टिप्लेक्स इत्यादी असा समज झाला असेल असे गृहीत धरू का?). संक्षिप्त रुपात एकच उदाहरण मांडण्याची जी चूक झाली त्याबद्दल दिलगीर आहे.
तुम्ही म्हटलेल्या वृक्षांची लागवड बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपन्या करतात हे नक्की. दाखले हवे असतील तर इन्फोसिसच्या बंगलोर, म्हैसूर, पुणे आवारात फेरफटका मारता येईल. मी इन्फोसिसचे नाव घेत आहे कारण पाहिले आहे, इन्फोसिसमधल्याच मित्रपरिवाराकडून आणि प्रियजनांकडून ऐकले आहे म्हणून, बाकी काही नाही. आणि कर्मचाऱ्यांना मोटारीऐवजी सायकल वापरण्यास प्रोत्साहन देणे वगैरे मुद्दे निश्चितच स्वागतार्ह आहेत, हे सुद्धा मला मान्य आहे. प्रदूषण कमी करण्याकडे हल्ली कंपन्यांचे आणि उद्योगांचे बारीक लक्ष असते; मग ते पोटतिडकीने दिले जात असो अगर आय एस ओ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी. जर पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण हे अशा प्रयत्नांचे फलित/लक्ष्य असेल तर प्रयत्नांमागचे कारण दुय्यम ठरावे.
पायाभूत सोईंच्या परिपूर्णतेकडे वाटचाल व्हायला हवी असेच माझेही मत आहे, जेणेकरून अपेक्षित "विकास" गाठता येईल. पण मी आधीच म्हटल्याप्रमाणे कोणत्याही एकाच बाजूने हटवादी धोरण राबवणे हे पुण्याला पेशवेकाळाव्यतिरिक्त इतर कुठे नेऊन सोडेल की नाही याची शंका वाटते. आणि हाच माझ्या प्रतिसादाचा मूळ मुद्दा होता आणि आहे. विकासाचे "साईड इफेक्ट्स" न परवडणारे असतील तर विकास नको म्हणणे कितपत बरोबर आहे? त्यापेक्षा असे दुष्परिणाम कमी किंवा नाहीसे करणारी औषधे शोधणे ही आपली जबाबदारी नाही का? घरटी चार दुचाकी आणि एक चार चाकी वापरून आपण विकासाच्या गप्पा करतो. रस्त्यांच्या दुर्दशेवर, बांधकाम व्यावसायिकांवर, पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणावर टीका करतो, आणि महिन्याकाठी एकदा एखादा चित्रपट पहायला मल्टिप्लेक्समधेसुद्धा आपल्यालाच जायचे असते. मुठेच्या पोटातला गाळ उपसायला किती स्वयंसेवक/तुमच्या-माझ्यापैकी किती जण उतरतात?तेव्हा मात्र आपण पालिकेला नावं ठेवणार लगेच!! आणि सदाशिव पेठेत किंवा बाजीराव रस्त्यावरचे घर अपुरे पडते (का कोणास ठाऊक!!) म्हणून डी एस के मध्ये सदनिकाही आपल्यालाच हवी असते. तरीही बांधकाम व्यावसायिकांना आपण दोष देणारच!! त्यामुळे जनतेची स्वेच्छा आणि प्रशासनाच्या कर्तृत्त्वाची त्याला मिळालेली जोड यांच्या संगमातूनच अपेक्षित विकास साधता येईल, अन्यथा नाही. त्याबाबत तुम्ही मांडलेल्या विचारांशी सहमत आणि तुमच्या तळमळीसाठी सहानुभूत आहे.
सुशोभीकरणासाठी जागा राखीव ठेवणे म्हणजे छान ताटलीमधे रंगीबेरंगी भाज्या सजवून पुढे केलेला हॅम-बर्गर आहे. दिसायला सुंदर पण पोषण मूल्य शून्य !
-- हा मुद्दा मला पूर्ण अमान्य आहे. सुशोभिकरणासाठी ठेवलेल्या राखीव जागा हे केवळ एक छोटे पाऊल/छोटा प्रयत्न आहे पर्यावरण संवर्धन/प्रदूषण नियंत्रणाचे/चा. छोटा आहे आणि मोठा सुद्धा होऊ शकतो. पण प्रयत्न असताना तो अपुरा असेल तर वाढवता येईल. तो मुळात नसणेच हे जास्त हानीकारक नाही का? एखादी गोष्ट सुरू केल्यावर त्यात सहभागी होणारी दुनिया असते हो, पण पुढाकार घेणारे फार थोडे असतात. पुढाकारामागची कारणे हा स्वतंत्र चर्चेचा/वादाचा मुद्दा. जर काही विधायक चालू आहे तर त्याच्या सफलतेच्या दिशेने आपणही (स्वतःहून) प्रयत्न करायला नकोत का!!??