तुमच्या सूचना या ऐकायला चांगल्या वाटतात पण किती वास्तववादी आहेत? काही गोष्टींचा तर शहरीकरणाशी काहीच संबंध दिसत नाही. कृपया मला याबद्दल काही स्पष्टीकरण मिळाल्यास आवडेल.
वस्तू विकल्या जातात.. पण आपणच ठरविले की या वस्तू शक्यतो विकत घ्यायच्या नाहीत तर ?
काही खाद्यपदार्थ हे पौष्टिक असूनही तुमच्या घरी खाल्ले जात नसतील, तर तुम्ही ते पदार्थ कशाला बनवाल? जे खाल्ले जाते तेच बनवणार ना? तसेच आहे हे. ज्याची मागणी आहे, ज्याचा खप होतो, तेच बनते. साधा अर्थशास्त्राचा नियम आहे.
आपल्यापासूनच जर सुरुवात केली तर ? अजून एक घर नाही घेतले तर ? जास्त पैसे मिळतात केवळ या कारणासाठी गावातले घर विकून धनकवडी/माळवाडी/सिंहगड ला राहायला नाही गेलो तर ?
सुस्थितीतला वाडा भरपूर पैशांसाठी नाही विकला तर ?? किंवा स्वतःचा वाडा पाडून त्याजागी इमारत बांधण्याऐवजी पुन्हा बहुमजली वाडाच बांधण्याचा आग्रह धरून पुण्याची वाडासंस्कृती टिकविण्याचा प्रयत्न केला तर ??
का? त्याने कोणाचा फायदा होणार आहे? यामागे केवळ जास्त पैसे मिळतात हेच कारण आहे का? दुसऱ्या बाजूने विचार करायचा, तर दोन घरं घेतली नाहीत तर त्या घरात बाहेरून लोक येऊन राहतील मग पुण्यातली गर्दी वाढेल. त्यामुळे दोन घरे घेतली नाहीत तरी फार काही फरक पडेल असे वाटत नाही. वाडासंस्कृतीचा यात काही संबंध नाही. बहुतेक वाड्यांमधून एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात होती. आता ती पद्धती निकालात निघाल्यामुळे वाड्यांचा यात काही संबंध दिसत नाही.
आपण पाण्याची नासाडी नाही केली तर ?? घरात जास्त पाणी लागणाऱ्या कमोड ऐवजी साधे संडास बसविले तर ?? शॉवर वापरणे टाळले तर ??
काहींना कमोडशिवाय होत नाही (काय ते सांगणे न लागे). तसेच घरातील वृद्धांना कमोड जास्त सोयीचा असतो. त्यामुळे कोणी कुठल्या पद्धतीने सफाई करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रश्न राहिला पाण्याच्या नासाडीचा, तेंव्हा, यासाठी आवश्यक तेवढी सांडपाणी शुद्धीकरण केंद्र चालवली गेली पाहिजेत आणि ते पाणी संडासासाठी वापरले गेले पाहिजे. या उपक्रमात निराळ्या अडचणी आहेत त्या प्रस्तुत विषयाच्या आवाक्याबाहेर आहेत. साध्या संडासांमध्ये सुद्धा टाकीची क्षमता कमोडच्या टाकीएवढीच असते. संडासाचा पॉट आणि टाकी या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या मिळतात आणि त्या वेगवेगळ्या बसवता येतात. शॉवरमुळे जास्त पाणी वापरले जाते हे मान्य मग त्यासाठी हँडशॉवर सारखे पर्याय आहेत जे गरज नसताना बंद करता येतात. त्याने पाण्याची बचत होते. शहराचा 'टुमदार'पणा कोणाच्या संडासावर आणि अंघोळीच्या पद्धतीवर अवलंबून असतो असे मला वाटत नाही.
शक्य तिथे सायकल वापरणे किंवा पायी जाणे हे पर्याय निवडले तर ?? आपल्या कॉलेजात जाणाऱ्या मुलांना वाहन घेऊन दिले नाही तर ? त्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले तर ?
यासाठी सार्वजनिक परिवहन संस्था सक्षम हवी. ती नाही म्हणूनतर आम्ही हे पर्याय निवडतो. जिथे पायी जाणे शक्य आहे तिथे कोणीही शहाणासुरता माणूस वाहनाने जाणार नाही. स्वतःचे वाहन चालू करून, मुक्कामाला पोचून तिथे ते पार्क करायचे म्हणजे एक कार्यक्रमच असतो. त्यामुळे पायी पोहोचू शकू अशा ठिकाणी वाहन नेण्यात काहीच अर्थ नाही. या तुमच्या मताशी सहमत.
आपण हॉटेलात खाणे कमी केले तर ? मॅकडी, सीसीडी बरिस्ता पिझ्झा वगैरे मधे जाणे सोडले तर (आता म्हणे मॅक्डी मधे पोहे आणि उपमा ठेवणार आहेत ! आपण घरी हेच तर खातो ना ?? ) ? आपण आपल्या मुलांना लेज, चॉकलेट्स, पेप्सी, कोक देणे कमी केले तर ??
हॉटेल ही आजकाल खाण्यापेक्षा भेटण्याची ठिकाणे झाली आहेत. आणि मग भेटलोच आहोत तर काहीतरी खाऊया, ही वृत्ती वाढते आहे. पण याचबरोबर असेही सांगावेसे वाटते, की भारताबाहेरही चांगले खाद्यपदार्थ मिळतात. त्यांची चव यातील काही हॉटेल्स देतात. केवळ भारतातील पदार्थांनाच चव असते आणि बाकीचे टाकाऊ असे धोरण स्वीकारणे कमालीचे प्रतिगामी आहे. आता बरिस्तासारखी कॉफी, मॅकडीचा बर्गर आणि पिझ्झा तुम्ही घरी करू लागलात, तर आपोआपच त्याची 'क्रेझ' कमी होईल. आज तुम्ही थालीपीठ खाण्यासाठी हॉटेलमध्ये जात नाही ना! याबरोबरच या गोष्टींचा शहरावर काही वाईट परिणाम होत आहे असे मला वाटत नाही. जाणकारांनी कृपया स्पष्ट करावं.
आपण नदीत निर्माल्य नाही टाकले तर ? गणपतीचे विसर्जन हौदात केले तर ? चालत्या गाडीतून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आपल्या सहप्रवाशांना तसे न करण्याची विनंती केली तर ??
याबाबतीत मी तुमच्याशी सहमत आहे. आजकाल मुंबईत बऱ्याच मंदिरांमध्ये निर्माल्य स्वीकारले जाते आणि त्यापासून खत तयार केले जाते. हा उपक्रम माझ्या मते पुण्यातही चालू असेल त्याची चौकशी करून त्याला प्रसिद्धी देणे महत्त्वाचे आहे. मुंबईतील बऱ्याच उपनगरातील लोक आज निर्माल्य अशा मंदिरांमध्ये जमा करतात. त्या दृष्टीने पुण्यात जनजागृती आवश्यक आहे.
चालत्या गाडीतून कचरा टाकणे हे माझ्या मते अतिशय असंस्कृतपणाचे लक्षण आहे. मी आणि माझे काही मित्र याबद्दल काम करतो आहोतच. एक स्वानुभवावरून सांगावेसे वाटते, जर तुमचा सहप्रवासी काही कचरा बाहेर टाकत असेल, तर त्याला समजावण्याऐवजी तुम्ही त्याच्या हातातील कचरा आपल्या हातात घेऊन आपल्याजवळील पिशवीत किंवा खिशात टाकला, तर त्याला ते जास्त परिणामकारकरीत्या समजते.
दुसऱ्याला पटविणे खूप अवघड असते. पण आपण जर कृतीत आणले तर आपले पाहून दुसरा आपसूकच तसे करायला लागतो
११०% सहमत. आणि दुसऱ्याने केले नाही तरी आपण चांगली वर्तणूक सोडू नये.
--ध्रुव.