काही खाद्यपदार्थ हे पौष्टिक असूनही तुमच्या घरी खाल्ले जात नसतील

मी ज्या पदार्थांबद्दल बोलत आहे ते पदार्थ 'जंक फूड' या प्रकारात मोडणारे, लेज, कुरकुरे, पेप्सी इत्यादी असंख्य पदार्थ आहेत. बाहेर मिळणारे पदार्थ अजिबात खाऊ नयेत असे माझे मुळीच म्हणणे नाही. माझे म्हणणे आहे ते असे पदार्थ कमीत कमीत खावेत.  आता या पदार्थांच्या मुद्द्यामुळे विषय भरकटू शकेल. लहान मुले आणि तरुणांना आकर्षित करणाऱ्या जाहिराती मुळे या गोष्टींचा खप वाढला. पिझ्झा बद्दल बोलायचे झाले तर २०-२५ एक वर्षांपूर्वीही पुण्यात 'द्वारका' किंवा अशा काही हॉटेलात मिळत होता. माझ्या आई-वडिलांनीही खाल्ल्याचे सांगितल्याचे आठवते. पण नंतरच्या काळात आपल्या लहानपणी हे सगळे खायला, मिळाले नाही निदान आपल्या मुलांना तरी असा विचार करून आई-वडिल मुलांना चॉकलेट, बिस्किटे वगैरे गोष्टी आणू लागले. पण आजच्या लहान मुलांना या वस्तू मिळणे म्हणजे आपला जन्मसिद्ध हक्क असल्यागत वाटू लागले आहे. सध्या त्यांना जेवणापेक्षा लेज आणि कुरकुरे जास्त प्रिय आहेत. याला कारण आपणच ! थोडक्यात ज्यायोगे आपल्याच पैशांवर (कारण आपणच त्या वस्तू खरेदी करणार) या बड्या कंपन्या आपल्याला फसविण्याच्या नव्या शकला लढवितात (जसे मिनरल वॉटर) ते करणे आपण थोड्याफार प्र्माणात का होईना थोपवू शकतो. जेव्हा मिनरल वॉटर बाजारात मिळत नव्हते तेव्हा आपण प्रवास करत नव्हतो काय ? स्थानिक पाणी पीत नव्हतो का ?? घरून पाण्याची बाटली किंवा कूल केज वापरत नव्हतो का?? जिथे पाणीटंचाई आहे तिथे विकतचे पाणी एकवेळ चांगला पर्याय आहे. पण सरसकट ?

इथे मुद्दा आहे वर चर्चिला गेलेला या कंपन्यांनी चालविलेला अनधिकृत भूजल उपसा !

दुसऱ्या बाजूने विचार करायचा, तर दोन घरं घेतली नाहीत तर त्या घरात बाहेरून लोक येऊन राहतील मग पुण्यातली गर्दी वाढेल

वाढेल ना.. तुमचा मुद्दा अगदी योग्य. आपण नाही घेतले तर दुसरे कोणीतरी घेणारच आहे ! पण मुळात हा प्रश्न झाला कसा ? तर गावातले लोक गावाबाहेर जायला लागले.. कारण काय तर गर्दी नको, शांताता हवी, किंवा आहे त्या घराचे जास्त पैसे मिळवून स्वस्तात घर विकत घ्यायचे वगैरे. लोकांची गरज ओळखून बांधकाम व्यावसायिकांनी गावाबाहेर घरे बांधायला सुरुवात केली. जेव्हा ही गोष्ट घडत होती त्यावेळी बाहेरून पुण्यात येणाऱ्यांची संख्या खूप कमी होती. पण जेव्हा पुण्यासारख्या चांगल्या हवेच्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत म्हटल्यावर गुंतवणूक किंवा स्थलांतर करण्यासाठी भविष्याची तरतूद म्हणून पुण्याबाहेरच्या आणि पुण्यातल्या मंडळींनी इथे घरे घेण्यास सुरुवात केली. पुण्यातली परिवहन व्यवस्था पहिल्यापासूनच 'अतिशय नावाजण्यासारखी' असल्याने लांब रहायला गेलेल्या लोकांना सायकली मोडीत काढाव्या लागून स्वतःची वाहने घेणे भागच होते. परिणाम ? टाटा-बजाज साठी इथे बाजारपेठ निर्माण झाली. मला इथे असे मुळीच म्हणायचे नाहीये की गावातल्या लोकांनी वाहने घेतेली नाहीत. कृपया गैरसमज नको ! प्रदूषण वाढत गेले. सगळेच स्वावलंबी असताना पी एमटी ची काय गरज ? जर पी एमटी वर लोकांचा दबाव वेळीच वाढला असता तर आज कदाचित वेगळी परिस्थिती असती. हे लोक लांब  तर रहायला गेले पण तिथे त्यांना पाण्याच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागले. त्यावेळी तिथे फारशी दुकाने नव्हती, भाजीपाला, वाणसामान यासाठी लोक महात्मा सोसायटीपासून डेक्कन/फुले मंडई येथे येत असत.  म्हणजे हा सगळा खटाटोप करून त्यांनी काय मिळवले ?? बर ज्या गर्दीपासून त्यांना पळायचे होते ती तर त्यांच्यामागे आजही आहेच. त्यांच्या कचेऱ्या घरापासून खूप लांब पर्यायाने घरी जायला लागणारा वेळ ? (म्हणजे जे आज दादर, गिरगाव सोडून ठाणे, डोंबिवली वगैरे ठिकाणी रहायला गेले आहेत त्यांना रोज गर्दीतून जितका प्रवास करायला लागतो आणि जो काही शारीरिक मानसिक ताण-तणाव भोगायला लागत आहे तो या लोकांच्याही नशीबी आला. तसेच पाणी टंचाई, अनधिकृत किंवा हलक्या प्रतीचे बांधकाम, जंगलतोडी मुळे घर गमावलेल्या जंगली श्वापदांचा मनुष्यवस्तीत वावर आणि हल्ला, जीव वैशिष्ट्याला हानी  हे प्रश्न ही आहेत.) आता तिकडे सुधारणा झाली पण हळूहळू बांधकाम व्यावसायिकांची टेकड्यांपर्यंत मजल गेली..परिणाम वेगळे सांगायला नकोत. आता तर काय कित्येक कंपन्या शहराबाहेरच असल्याने कुठेही राहिले तरी सगळ्यांना तोच अनुभव !

वाडयाबद्दल बोलायचे तर माझ्या घराच्या आसपासचे कित्येक सुस्थितीतले वाडे केवळ पैसा याच कारणासाठी विकले गेले आहेत. आमच्या वाड्याबद्दल(आमचा म्हणजे आमच्या मालकीचा नव्हे) बोलायचे तर पूर्णपणे मोडकळीस आल्याने पाडावा लागला. वाड्यामधे साधारण ५० वर्षांपूर्वी पर्यंत असेल एकत्र कुटुंबपद्धती. पण हे सगळ्या वाड्यांना लागू नव्हते. कित्येक वाड्यांमधे आमच्यासारखे भाडेकरू राहत होते आणि अजूनही राहतात त्यामुळे वाडासंस्कृती निकालात काढण्याचा आपला मुद्दा पटत नाही. आजही जसे अनेक लोक इमारतींमधे भाड्याने राहतात तसेच ते नव्याने वाडापद्धतीने बांधलेल्या वाड्यांमधे राहू शकले असते. किंवा वाड्यातच आपल्या मालकीची घरे बाळगू शकले असते. जसे जयपूर मधे सगळ्याच घरांना गुलाबी रंग असतो. ते त्यांची परंपरा टिकवू शकतात तर आपण का नाही ? असे करण्याने मोकळी जागा शिल्लक राहून मुलांना खेळायला, झाडे लावायला जागा शिल्लक राहू शकली असती. 'शिवतीर्थ नगर' मधे असा एकमजली वाडा माझ्या पाहण्यात आहे. अर्थात तिथे एकच कुटुंब राहत असावे. पण ही गोष्ट अगदीच अशक्य नाही. आजही पेठांमधे वाड्याच्या दर्शनी भागातील जागा दुकानांनी व्यापली आहे. त्यामुळे या पद्धतीमधेही दुकानांसाठी जागा ठेवता आली असती. अर्थातच वाडापद्धती चे बांधकाम सर्व शक्यतांचा विचार करूनच करायला हवे पण पुण्याचे 'पुणे'पण टिकविण्यासाठी हा पर्याय होता आणि आहे.

संडास आणि शॉवर

आपण अगदी अर्थाचा अनर्थ करत आहात !! या चर्चेमधे अनेक मुद्दे उठले आहेत त्यातला एक म्हणजे 'पाण्याची नासाडी'.  एकीकडे पुण्यातील काही भागांना नको इतके पाणी मिळते आणि काही भागात पाणी लोकांच्या डोळ्यातून पाणी काढते. अशी परिस्थिती असताना पाणी वाचविण्याची जबाबदारी भरपूर पाणी असणाऱ्या भागातील लोकांची आहे. उन्हाळा सुरू झाला की धरणातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी 'सकाळ' मधे येते ती जरूर वाचत जा. माझ्या म्हणण्याचा अर्थ कळेल.

साध्या पद्धतीच्या संडास साठीच्या टाकीचा वापर करून फ्लश किंवा ड्रेनेज पाईप चा काहीही दोष नसून कमोड मधे कमी पाण्यामुळे काय पंचाईत होते हे मी स्वतः काही ठिकाणी अनुभवले आहे.

वृद्ध व्यक्तींबद्दल बोलायचे झाले तर सध्या (खरं तर कित्येक वर्षांपासून) बाजारात तशा खुर्च्या मिळतात. संडासातच भिंतीला फिट करून घेण्याच्या घडीचे संडास, खुर्च्यांसारखे उघडमीट करता येणारे संडास असे कित्येक पर्याय अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत. वृद्ध व्यक्तींच्या मानसिकतेला धरून पाहिले तर हे संडास अतिशय उपयुक्त आहेत. आता जर आपल्या आजी/अजोबांना कमोडमधे जाण्यास काही वाटत नसेल तरीही असे कित्येक वयस्कर लोक आहेत ज्यांना कमोड हा प्रकार पटत नाही.

कमोड मधे गेल्या शिवाय होत नसेल तर हा आपला मुद्दा मला केवळ विरोधादाखल वाटला. कारण कमोड ही काही वर्षांपूर्वीची फॅशन आहे.  

संडास आणि शॉवर या मधे पाण्याची नासाडी हा प्रश्न उपस्थित झाल्याने पाणीटंचाईमुळे शहराचा टुमदारपणा नाहीसा झाला असे म्हणण्यास हरकत नसावी.

हॉटेले ही आजकाल खाण्यापेक्षा भेटण्याची ठिकाणे झाली आहेत. मग भेटलोच आहोत तर काहीतरी खाऊया,

हे ही केवळ विरोधाला विरोध या प्रकारचे मत आहे. ही गोष्ट ५-१० वर्षांपूर्वी म्हणाला असतात तर ती योग्य होती. पण आजकाल बहुसंख्य लोक केवळ खाण्यासाठीच हॉटेलात जातात. हॉटेलातून घरी पार्सल ही आणले जाते. भेटण्याचे ठिकाण निवांत असावे असे मला वाटते. आपल्यामागे १०० लोक रांग लावून उभे आहेत आणि वेटर आपले कधे खाऊन होते याकडे लक्ष देऊन आहे याला भेटण्याचे ठिकाण म्हणणे हास्यास्पद आहे. पुण्यात गल्लोगल्ली निघालेली हॉटेले भेटण्याची ठिकाणे आहेत ?? मॅक्डी, बरिस्ता मधे जाणारे बहुसंख्य लोक तरूण वर्गातील त्यातही जास्त कॉलेजातले आहेत. पदार्थांची चव बघण्यासाठी जाणे वेगळे आणि रोज तिथे पडिक असणे वेगळे नाही का ?? माझा मुद्दा पडिक असणाऱ्या लोकांबद्दल आहे. हे आपल्या लक्षात येत नाही हे दुर्दैव ! सध्या थालीपिठे ही हॉटेलात मिळतात. आणि इतर गोष्टी खाल्ल्या जातात तर थालीपिठे का खाऊ नयेत ? पोहे, उपमा, इडली डोसे, पाव भाजी, पिझ्झा, बर्गर, पास्ता हे सगळेच्या सगळे पदार्थ घरी सर्रास केले जात असूनही अजूनही लोक हे पदार्थ हॉटेलात खातात ! तरीही यातील कुठल्याही पदार्थाची क्रेझ कमी झल्याचे माझ्या ऐकीवात नाही. अगदी घरच्या सारखे पोळी भाजी वरण भात वगैरे पदार्थ बनविणाऱ्या महाराष्ट्रीय थाळीची हॉटेल्स किती जोरात चालतात याचा आपल्याला अनुभव नाही याचे आश्चर्य वाटते !! आपण पुण्यातले दिसत नाही ! आणि थाळी जेवूनही लोकांची क्रेझ कमी होऊन त्यांनी घरचे पोळी भाजीचेच जेवण सोडले नाही.  

हॉटेल मधे खाण्याचा मुद्दा 'पिकते ते विकते, लोक विकत घेतात म्हणून विकणारे विकतात' या मुद्द्याशी संलग्न आहेत. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की या चर्चेतील सर्वांची मुद्दे वाचावेत म्हणजे कदाचित आपल्याला थोडीफार कल्पना येऊ शकेल. उगीचच प्रत्येक वाक्याचा टुमदारपणाशी संबंध लावायचा हास्यास्पद प्रयत्न करू नये.

जिथे पायी जाणे शक्य आहे तिथे कोणीही शहाणासुरता माणूस वाहनाने जाणार नाही. स्वतःचे वाहन

यासाठीही पुन्हा सांगावेसे वाटते की आपण जर पुण्यात असाल तर डोळे उघडून आजूबाजूला पाहा. लोकांना विचारा पेरुगेट पासून स.प. पाशी जायचे आहे. पायी जाल की वाहनानी. आपण स्वतः वाहनचालक असाल तर तपासून पहा. लोकांच्या शहाणपणावर गंज चढला आहे म्हणून तर हा लेख लिहिण्याची वेळ आली आहे !

समारोप करताना इतकेच सांगेन की आपल्या मतांचा मी आदर करते पण केवळ विरोधाला विरोध करणे सोडा कारण आपण इथे शाळा-कॉलेजातल्या वाद-विवाद स्पर्धा खेळत नाही. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला काय घडत आहे पाहा. स्वतःच्या घरात जरी डोकावून पाहिलेत तरी कित्येक गोष्टी समजतील. मी जे अनुभव लिहिले आहेत त्यातले कित्येक अनुभव माझ्या घरात, अगदी माझ्या स्वतःमधे मला पाहायला मिळाले आहेत. माणसाने स्वतःच स्वतःला प्रश्न विचारलेले कधीही चांगले ! खूप उत्तरे मिळतात. आपणही जरूर करून पाहा.

आणि त्याहीपेक्षा महत्वाचे आपण आपल्या गावाची आणि पर्यायाने आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी काय प्रयत्न करू शकू त्याचा विचार करा आणि ते पर्याय इतरांसमोर मांडलेत तर सर्वांनाच आवडेल. नवीन दिशा मिळेल.

धन्यवाद