टेकड्यांचं रक्षण करण्यासाठी झटणारी 'टेकडी पुणे' किंवा हवेतील आरोग्याला धोकादायक कणांची पातळी दर्शविणारे फलक चौकाचौकात लावणारी 'निर्धार' ही संस्था यांचे कार्य निश्चितपणे उल्लेखनीय आहे. २-३ वर्षांपूर्वी 'टेकडी पुणे' च्या मोहिमांमधे बरेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या हिरिरीने सामील झाले होते. पण आज टेकडी पुणे कुठे गेली आहे मला माहित नाही. तिचे अस्तित्त्व जाणवत नाही.

नदीपात्रातला गाळ काढण्याचा किंवा इंद्रायणीच्या पात्रातून पर्यावरण दिंडी काढण्याचा उपक्रम असे चांगले कार्यक्रम पुणे विद्यापिठाचे पर्यावरणशास्त्राचे विद्यार्थी आयोजित करत असतात. पण या गोष्टींची व्याप्ती कमी आहे. मला यासाठी प्रत्यक्ष काम करायला आवडेल. पुण्यातील मनोगती मला मदत करतील काय? असेच उपक्रम भीमाशंकरच्या जंगलामधे, सिंहगड-हरिश्चंद्रगड अशा किल्ल्यांवर आणि इतरत्र बाकीच्या शहरांमधूनही राबवता येतील. आपण त्यासाठी मनोगत तर्फे काही करू शकतो का?

मध्यंतरी मुंबईतील खारफुटी जंगलांच्या संरक्षणासाठी बरेच लोक एकत्र येऊन स्वयंसेवा करत होते असे वाचले. ही गोष्ट निश्चित अनुकरणीय आहे. पुण्यात सायकल चालवा मोहीम सुरू झाली आणि नंतर बारगळली. त्यासाठी आपण काही करू शकतो का?

नुसत्या गप्पा मारण्यासाठी हा विषय चर्चेला टाकावा असं नक्कीच मनात नव्हतं. त्यातून जर चांगलं आणि करण्याजोगं असं काहीतरी बाहेर येऊ शकत असेल तर चर्चा वाचणाऱ्यांचे आणि त्यात भाग घेणाऱ्यांचे श्रम आणि ई-तास सत्कारणी लागतील असे वाटते.

अनिर्बंध बांधकामांबद्दल काही करणे सध्या माझ्या शक्तीबाहेरचे आहे. पण त्यासाठीही आपल्याला काही करता येऊ शकत असेल तर जरूर कळवावे.

--अदिती

जाता जाता-- अलिकडेच सकाळ वृत्तपत्रात दाक्षिणात्य सुपरस्टार(प्रतिशब्द सुचवावा) चिरंजीवी याने पर्यावरणविषयक संस्थांनी केलेल्या आवाहनाला मान देऊन कोकाकोला कंपनीसाठी जाहिरात करण्याचा करार रद्द केल्याची बातमी छापून आली आहे. त्यात म्हटले आहे की अमेरिकेतील अनेक विश्वविद्यालयांमधून त्यांच्या शैक्षणिक परिसरात कोकाकोला विकण्यास बंदी घालण्यात आली आहे.याचं कारण कोकाकोलाच्या द्रावणात असलेल्या आरोग्यास हानीकारक आणि प्रसंगी विषारी ठरू शकणाऱ्या पदार्थांचं प्रमाण हे देण्यात आलं आहे.  नजीकच्या भविष्यकाळात आपल्याकडेही अशी परिस्थिती आलेली पाहण्यास आनंद वाटेल.