झकास हो सर्वसाक्षीकाका.. धमाल लिहिलं आहे तुम्ही अगदी ! आख्खा लेखच झकास आहे. खूप आवडला.

पोलिसांबद्दलचे माझे काही अनुभव :

मी नविनच सायकल चालवायला शिकले होते तेव्हा आणि रोड बॅलन्स म्हणतात ती चीज काही नीट जमत नव्हती आणीबाणीच्या वेळी. अशी मी सायकलवरून शाळेत चाललेली असताना उलट बाजूने एक कार दुसऱ्या कारला ओव्हरटेक करायला मध्येच घुसली आणि त्यामुळे माझी सायकल पुढे सरकायला अगदीच चिंचोळी जागा राहिली. त्यातूनही मला लिलया काढता आला असता रस्ता पण तेवढा जम बसला नव्हता सायकल चालवण्यात त्यामुळे मनात धांदल उडाली माझ्या आणि त्यामुळे माझ्या सायकलसमोरून जाणाऱ्या बाईकला धडक बसली. चूक माझीच होती. धडक दिली तो बाईकस्वार पोलिस होता हे कळल्यावर डोळ्यासमोर काजवे चमकले. त्यांच्या बाईकचं नुकसान झालं होतं, त्याचंही वाईट वाटत होतं. मी त्यांना 'माफ करा, मी नविनच शिकले आहे सायकल चालवायला.' असं काहितरी म्हणून माफी मागायला पुढे जाणार होते, पण घडलेल्या सर्व प्रकाराने हेऽऽ गर्दी जमा झाली होती. 'पोलिस कसे निष्काळजी असतात बघा.' पासून सुरू होऊन 'लहान मुलींनासुद्धा सोडत नाहीत लंपट मेले..' पर्यंत लोकांची बोलणी गेली.तो पोलिस शांत असावा स्वभावाने म्हणून त्याने मला 'कुठे लागलं तर नाही ना बाळ तुला?' असं म्हणत माझ्या सायकलचं वाकडं झालेलं हँडल नीट करून दिलं आणि 'शाळेला जा आता. उशीर होईल तुला.' असं म्हटलं. मी कशीबशी सॉरी म्हणाले त्यांना आणि अकारण स्त्रीदाक्षिण्य दाखवणाऱ्या त्या जमावाला हात जोडून 'चूक माझी होती, कृपा करून काकांना उगीच काहीच्याकाही बोलू नका.' असं सांगितलं आणि निघून गेले. पुढे काय झालं ते माहित नाही.
   
एकदा मी आणि माझी मैत्रिण अदिती ( मनोगतवरची नाही ) चालत, गप्पा मारत ऑफिसमधून घरी चाललो होतो. रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी ( ! ) एक पोलीस होता. आमची जोडगोळी रस्त्यावरून पुढे जात असताना नेमकं त्याचवेळी त्याच्या कामाचा एक भाग म्हणून त्याने शिट्टी मारली आणि त्याच्या शिट्टीचा आवाज अदुच्या कानात घुमला. आधीच ऑफिसमधल्या छोट्यामोठ्या वादांनी चेकाळलेली अदु, जाम भडकली त्याच्यावर.. "काय हो? दिसत नाही का तुम्हाला? कुठेही शिट्ट्या काय फुंकत बसता? हा रस्ता पायी चालणाऱ्यांसाठी असताना इथे तुमची घुसखोरी कशाला? सांगू का तुमच्या मोठ्या साहेबांना.. " वगैरे वगैरे टकळी सुरू झाली तिची ! त्या पोलिसाला घाम फुटला होता आणि मला त्या दोघांचे चेहरे आणि पूर्ण परिस्थिती बघून हसू आवरनासं झालं होतं. त्यानंतर कधीच त्या पोलिसाला शिट्टी मारताना मीतरी पाहिलं नाही !!!

एकदा माझी एक मैत्रिण तिच्या वाग्दत्त वराशी ओळख करून देणार होती. आम्ही तिघंजणं एका नियोजित ठिकाणी भेटायचं असं ठरलं होतं. मी तिथे पोहोचले तेव्हा ते दोघं तर नाही दिसले पण तिथे खूप मोठ्ठा जमाव जमलेला दिसला. ते दोघं येईपर्यंत वेळही घालवायचा होता आणि नक्की काय चाललं आहे हेही जाणून घेण्याची उत्सुकता होती. पाय उंचावून बघते तर काय? त्या जमावाच्या केंद्रस्थानी माझी मैत्रिण आणि तिचा वाग्दत्त वर !! मी जमाव फोडून कशीबशी आत गेले तर मैत्रिणीने मला बघताच "वेदु, तू तरी सांग या पोलिसाला की 'हे' कोण आहेत आणि हेसुद्धा सांग की 'हे' मला काही त्रास देत नव्हते तर आमचं भांडण झाल्याने मी रडत होते तर समजूत घालायचा प्रयत्न करत होते !" सगळं प्रकरण निपटेस्तोवर त्यांचं भांडण लोपलं होतं आणि नाट्यमय गंमतीशीर रितीने तिच्या भावी नवऱ्याची माझ्याशी ओळख झाली होती !