सर्वांच्या प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद.

ही कथा जेव्हा आमच्या नियतकालिकात वाचली तेव्हा एकंदरीतच खूप आवडली, आणि भाषांतरीत कराविशी वाटली. मूळ कथा खरंच खूप छान शैलीत लिहिलेली आहे, माझ्याकडून नीट भाषांतरीत झाली नाही बहुदा. हा माझा भाषांतर करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे तो ( व्यनितून ), भोमेकाका, शशांक, चक्रपाणि, मी_आशुतोष ( व्यनितून ) इत्यादींनी म्हटले आहे त्याप्रमाणे कथेच्या घटनास्थळाला समजून घेऊन योग्य शब्द वापरून भाषांतर करण्यात मी कमी पडल्याने चुका झाल्या आहेत खऱ्या. पुढच्या वेळेस खचितच मी आणखीन नीट प्रयत्न करेन.

कथेच्या शेवटच्या भागात खुर्शिद त्यांनी कष्टाने बनवलेला गालिचा तिथेच सोडून जातो, हा भागच खरं तर मला खूप आवडला.

खुर्शिद हा मुळात एक कलाकार आहे, त्याच्या आजवरच्या आयुष्यात विणली गेलेली अप्रतिम सुंदर कलावस्तू त्याने दाखवली असता त्याबद्दल त्याच्याइतका आनंद कोणालाच झालेला त्याला दिसला नाही, जो त्याला अपेक्षित होता. अमेरिकी हल्ल्याबद्दलच जो तो बोलत राहिला, यामुळे त्याच्यातल्या कलाकाराला खूपच विषाद झाला आहे असे वाटले. त्याला जो अलोट आनंद इतरांच्या चेहऱ्यावरही अनुभवायचा होता तो त्याला अनुभवायला मिळाला नाही केवळ त्या एका बातमीमुळे. त्याच खंत मनःस्थितीत तो इतरांशी बोलत गेला आणि अगदी जवळच्या आणि आजवर कधीही कुठल्याच स्वरुपाची कुरकुर न केलेल्या जेमिमाकडून 'ते' वाक्य ऐकल्यावर तो आणखीच ढासळला असे वाटते. पालक, नवरा या नात्याच्या मागणीला रुकार देताना त्याला त्याच्या स्वत्वाशी, स्वतःच्या मुल्यांशी मनाविरुद्ध तडजोड करून त्याचं शहर सोडून जावं लागलं याने त्याच्यातली उर्मीच हरपल्यासारखी वाटली. त्या गालिच्याच्या माध्यमातून त्याने त्याचं एक स्वप्नच जणू साकारलं होतं, ज्याला त्याच्या आसपासच्या जगात काहीच महत्त्व उरलेलं नाही असं त्याला वाटलं आणि स्वप्नातून बाहेर पडून सत्यात जगायला सुरूवात करायची असं ठरवूनच की काय जणू काही त्याने तो गालिचा, त्याच्या स्वप्नांचं प्रतिक म्हणून तिथेच सोडून जायचा निर्णय घेतला असे मला वाटले.

उपरोल्लिखित विवेचन हे सर्वतः माझे स्वतःच्या मतांवर आधारित आहे. मूळ लेखकाचा संपर्कासाठीचा दिलेला पत्ता आता कदाचित बदललेला असल्याने मूळ लेखकाशी मी संपर्क साधू शकले नाही, त्यामुळे त्यांची स्वतःची याबद्दलची मते जाणून घेता आली नाहीत. चुभूद्याघ्या.