विश्रांती म्हणले की आम्हाला आमची सर्वात प्रिय गोष्ट आठवते - ती म्हणजे झोप!
लहानपणी आम्ही एक सुभाषित रचले होते:
"भोजनान्ते फलाहारं, फलाहारान्तभोजनम्।
भोजनाहारयोर्मध्ये सा निद्रा सुप्रतिष्ठिता॥"
खरच,
आयुष्यात दुसरे सुख नाही
मम्मम् आणि गाईगाई.
तेव्हा खाणे हे काम आणि झोप ही विश्रांती.
१२ तासांचे जागरण भरून काढण्यासाठी माणसाने दररोज उरलेले १२ तास झोपून काढले पाहिजेत असे आमचे ठाम मत आहे. शरीराने मोठी झालेली अनेक माणसे आमचा हा सल्ला हास्यास्पद मानताना दिसतात. पण छोटी बाळे मात्र हुशार हो! ती बघा कशी प्रामाणिकपणे आणि शिस्तीने आपले झोपेचे कार्य पार पाडत असतात. मनुष्याचे वय जसे वाढत जाते तसा तो बेशिस्त बनू लागतो. झोपेशी प्रतारणा करू लागतो. 'वाढत्या वयाबरोबर माणसाची झोपेची आवश्यकता कमी कमी होत जाते' वगैरे फुटकळ वैज्ञानिक सिद्धांत मांडून उगाचच रात्र रात्र आपल्या दूरचित्रवाणी संचासमोर बसून राहतो.
येणारी प्रत्येक जांभई ही नजिकच्या भविष्यातल्या झोपेची नांदी असते.
झोप हे एक 'संगीत' आहे. देवाचे नाव घेऊन आम्ही झोपेला सुरुवात करतो. तंबोर्याच्या तारा जुळवाव्या तशी आम्ही आमची पांघरुणे जोडतो. ह्या कुशीवर त्या कुशीवर वगैरे वळून तबलाडग्ग्याचा अंदाज घेतो. आणि मग झोपेचा सा लावतो. घोरण्याचे आरोह अवरोह सुरू होतात. थकलेल्या देहाला आणि मनालाही रिझवायचे काम करण्यात निद्राराणी मोठी पटाईत आहे. सुरेल स्वप्नांचे छोटेबडे ख्याल सुचतात. हलका डोळा, वरवरची झोप, सावध झोप, गाढ झोप, साखरझोप ह्या मार्गाने झोपेची मैफिल भैरवीवर येऊन ठेपते. जाग आल्यावरही पांघरुणात गुरफटून पडण्यातले सौख्य काही निराळेच. तो तर झोपेचा परमोच्च बिंदू! ही मैफिल कधी संपूच नये असे वाटते पण मनाविरुद्ध आम्ही अंथरुणातून बाहेर पडतो आणि कामाला लागतो.
चला आता आमची झोपायची वेळ झाली तेव्हा हे लिखाण इथेच संपवतो.
आपला
(झोपाळू) प्रवासी