असं म्हटल्या जातं की कुठलंही विधायक काम कुठल्याही पवित्र व सकारात्मक पायावर उभं राहतं; कुणाच्याही विरोधावर उभं राहिलेलं कार्य मुळातच परावलंबी असतं व फार काळ टिकत नाही. असो.

  पण येथे काही उदाहरणे नमूद करणे माझं काम समजतो.

* शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण्याची शपथ घेतली होती. ( मुसलमान संपवण्याची नव्हे !)

*बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे दलितोद्धार हे होतं . ब्राह्मण संपवणे किंवा ब्राह्मण विरोध हे कधीच नव्हतं . त्यामुळे ते बघता बघता एवढं मोठं कार्य उभारू शकले.

*मा. फुले सुद्धा बहुजन व शेतकरी यांचा विकास हा मूळ विचार घेऊन काम करीत.

         ब्राह्मण विरोध ही यांच्या कुणाच्याही कार्याची प्रेरणा नव्हती. तरी सुद्धा आपल्या वाचनात येतं की यांना वेळोवेळी ब्राह्मण समाजाचा विरोध झाला व त्या विरोधाला त्यांनी त्या त्या वेळी पूर्ण शक्तीने विरोध केला. आणि केवळ ब्राह्मणच का...? त्यांनी आपल्या जीवनमूल्यांच्या विरोधात जाणा~या आपल्या स्वकीय विरुद्ध सुद्धा वेळोवेळी कठोर भूमिका घेतली.  पण मूळ प्रेरणा होती ती शोषण मुक्त समाज निर्माण करण्याची.

          उद्या समजा हिंदू धर्मातील ब्राह्मण वर्गाने कुठल्या नव्या धर्मात जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या या शिवधर्माने शिव्या तरी कुणाला द्याव्या? आणि मा.म. देशमुखांनी कुणाला शिव्या द्याव्या?. मा. म. मी वाचले आहेत. व त्यांच्या संशोधन काही जागी मनाला भिडतंही पण त्यांचा जातीय विचार त्यांच्या संशोधकावर मात करतो असं माझं वैयक्तिक मत. मुळात कुणाचंही कर्तृत्व हे कर्माधारीत न ठरता ते जन्माधारीत असणे म्हणजे ब्राम्हणी मनोवृत्ती !(जीच्या विरोधात शिवाजी महाराज, म. फुले , शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, वि. दा. सावरकर, साने गुरुजी यांनी लढा दिला) 

     असं असताना कुणी एक योद्धा ब्राह्मण जातीत जन्मला तर त्याच्या जन्माच्या चौकश्या करून. एका राष्ट्रपुरुषाच्या आईवर लांच्छन लावणे हे कुठलं संशोधन? जीवशास्त्रीय बाप हा शब्द मा. मं. नी मराठीला दिला. माझ्या मते हे आद्य जेम्स लेन होत.

   मी पुरुषोत्तम खेडेकरांबद्दल काहीच बोलू इच्छित नाही. आता पर्यंत खूप बोलून झाले आहे. आणी ते इतरत्र सुद्धा वाचायला मिळेल. मी खाली काही प्रश्न देतो आहे. गेल्या तीन वर्षापासून मी या शिवधर्मा बद्दल वाचतो आहे.

१) मासाहेब जीजाऊच्यां नावाचा जयघोष करीत सुरू झालेल्या या धर्मात स्त्रियांचं स्थान काय असेल?

२) मुळात धर्म म्हटला तर देव असतो. मग शिव धर्मात देवाचं स्थान आहे का?

३) आपणास संत तुकाराम महाराज चालतात आणी विठ्ठल नाही हे कसं ?

४) समतेचे प्रवर्ते पण ब्राह्मण जातीत जन्मलेले ज्ञानेश्वर आपणास पूजनीय आहेत का?

५) आपल्या धर्मात काही धार्मिक विधी आहेत का? जन्म, नामकरण, दीक्षा, लग्न, अंत्यसंस्कार.

६) असतील तर ते आपले आपणच करणार की त्या साठी मराठा ( बहुजन म्हणा हवं तर ! ) ब्राह्मण तयार करणार?

७) या धर्मात मराठा, देशमुख, कुणबी, पाटील समाजाचे सदस्य अधिक आहे त्या प्रमाणात इतर बहुजन समाज कमी आहे, पण आहे हे नाकारून नाही चालणार... पण हिंदू समाजाचं देणं असणारी जात सोडून जाती विरहित शिवधर्मात गेलेल्या लोकांत या इतर समाजात बेटी व्यवहार होईल का?

     अश्या प्रकारे अनेक मुद्दे आहेत. पण तूर्तास यांचे स्पष्टीकरण तर येऊ द्यात... !

जय जीजाऊ !!!