वेदश्री,
धुम्रपान व त्याचा धुम्रपान न करणाऱ्यांना होणारा त्रास ही एक समस्या आहे. अनेक ठिकाणी कामाच्या ठिकाणी धुम्रपानास बंदी असते, ज्याला करायचे असेल तो / ती धुम्रपानासाठी उपलब्ध असलेल्या जागी जाऊन तलफ भागवतात. तरीही धुम्रपान केल्यावर करणाऱ्याच्या तोंडाला येणारा दर्प अनेकांना सहन होत नाही.
धुम्रपान करणाऱ्याने जर थोडी सामाजीक जाणीव दाखवली तर इतरांना त्यांना सांगायची वेळ येणार नाही.
रागावू नकोस, पण चांगला संदेश देणारी ही कथा प्रत्यक्षात मात्र बालकथा झाली आहे.
आई ग, हा बघ ना मला त्रास देतो अशी तक्रार करत एक उच्चशिक्षीत मुलगी साहेबाकडे जाते, पुढे त्या धुम्रपान करणाऱ्याचे कसे नुकसान होते व साहेबाने सांगताच तो एकदम एकदम धुम्रपान सोडून देतो व सारे कसे गुण्या-गोविंदाने राहू लागतात. सगळेच बालकथेतले वाटते.
मुळात संगणक क्षेत्रात काम करणारी मुलगी साहेबाकडे रडत जाते, स्वतः काहीच प्रयत्न करीत नाही व हातातला एक प्रकल्प साध्या कारणासाठी सहजी सोडायला तयार होते हे पटणारे नाही. कथेच्या पुढील भागात असे आहे की आनंदला जेव्हा समजते की त्याच्या धुम्रपानाचा इतरांना त्रास होतो तेव्हा तो तात्काळ धुम्रपान सोडायचे मान्य करतो. मग अशा समंजस सहकाऱ्याला थेट सांगायचे सोडून वरिष्ठांकडे तक्रार व तडकाफ़डकी आपला प्रकल्प बदलून घ्यायची मागणी हे अजिबात न पटणारे आहे.
मुळात आपला प्रकल्प बदलण्या ऐवजी त्या व्यक्तिला बदलण्याचा आग्रह का नको? आणि आपल्य्याला होणारा त्रास ज्याच्यामुळे होतो ते त्याला का सांगु नये? जर त्या व्यक्तिला स्वतःला समजत नसेल तर दुसऱ्याने सांगायला काहीच हरकत नाही की त्याच्या धुम्रपानाचा इतराना त्रास होत आहे. आता हे मिश्कीलपणे सांगायचे की सहजपणे सांगायचे की काही नाटकीपणे सांगायचे की तक्रारीच्या सूरात सांगायचे हे सांगणारा व ऐकणारा आणि परस्पर संबंध यावर अवलंबून आहे.
केवळ चमुतल्या एखाद्याचा एखादा अवगुण त्रासदायक ठरतो म्हणून स्वतःची दिशा बदलायची हा कमकुवतपणा नाही का? अशी व्यक्ती पुढे कधीच 'बॉस' होउ शकणार नाही.
दुसरी गोष्ट. 'बॉस' ला असल्या आट्यापाट्या खेळण्या पलीकडे काही उद्योग नसावा का? आज एकीने ही तक्रार केली. उद्या एखादा शाकाहारी मुलगा रडत येइल की जेवताना त्याच्या प्रकल्पातली एक मुलगी मासे खाते व त्याला त्यामुळे जेवण जात नाही व रिकाम्या पोटी कामात लक्ष लगत नाही. परवा एखादी बॉस कडे सांगत येईल की तीच्या सहकाऱ्याच्या पायमोज्यांना दुर्गंधी येते सबब काम बदलून द्या!
वेदश्री, व्यावसायिक जीवनात आपल्या समस्या आपणच हाताळायच्या असतात. इथे स्पर्धेच्या जगात 'बॉस' ला काय बरोबर नी काय चूक यापेक्षा त्याचे ध्येय गाठण्यासाठी त्याला कोण उपयुक्त अधिक हे त्याला महत्त्वाचे असते. शिवाय प्रत्येक जण आपापल्या व्यवधानात असतो. साहजीकच समस्येपेक्षा मदतीला धावणारा मदतनीस प्रत्येक 'बॉस' ला आवड्तो.
वेदश्री, तुझ्या कल्पना छान असतात पण प्रत्येक वेळी सादर करायची पद्धत एकच अशी (लडिवाळ )असते. त्यात आशयानुसार बदल केलेस आम्हाला वाचायला आवडेल.