धूम्रपानाबद्दल तिडीक असलेली पण आणि २ सिगरेट मारल्याशिवाय विचारांना तरतरी न येणारी पण अशी दोन्ही प्रकारची माणसे समाजात आहेत आणि दोन्ही पक्ष तितक्याच हिरीरीने आपल्या बाजूचे समर्थन करताना दिसतात. माझी निरीक्षणे अशीः
१. धूम्रपान आरोग्याला हानीकारक खरे, पण तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे समोरच्याला त्रास होऊ नये ही जबाबदारी पाळणे मात्र अत्यंत महत्वाचे आहे.
२. कथेतील उपाय 'हायपोथेटिकल', प्रत्यक्षात शक्य नाही.
३. आमच्या इथे धूम्रपानास मनाई आहे. आणि दर ५ फुटावर आणि प्रसाधनगृहात धूम्र दर्शक (इंडिकेटर्स) आहेत. त्यामुळे कोणी कोपऱ्यात जाऊन धूम्रपानप्रयत्न केल्यास अत्यंत कर्कश्य घंटी वाजते व ती रखवालदाराला सांगून बंद करेपर्यंत वाजतच राहते.मधल्या सुट्टीत सज्जात (बाल्कनीत) किंवा खाली जाऊन मंडळी सिगारेट 'मारुन' येतात. असे 'स्मोकिंग झोन' सर्व कचेऱ्यांनी पाळल्यास उत्तम.
४. मिंट/बडीशेप/तत्सम वासहारक पदार्थ खाल्ल्यास नंतरच्या वासाचा त्रास कमी होतो. त्यामुळे अशा मंडळींस कांडी ओढून झाल्यावर मिंट खाण्यास प्रवृत्त करणे.
५. बंद जागी/बसमधे/अरुंद आणि खिडक्या नसलेल्या जिन्यात धूम्रपान करणे हा मात्र अक्षम्य अपराध मानला जावा आणि या गोष्टी शक्य त्या प्रकारे वरिष्ठांची/अधिकारी व्यक्तींची मदत घेऊन कमी करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा.
६. कथेची नायिका गट बदलायला मोठ्या साहेबाकडे जाते. बऱ्याच ठिकाणी मोठ्या साहेबाचेच दर २ तासांना एक सिगऱेट मारल्याशिवाय चालत नाही. असा माणूस कथानायिकेला भेटला तर ती काय करेल?गट बदलला तशी कचेरी बदलणार?
७. यापैकी काहीच उपाय शक्य नसल्यास 'आलिया धुराशी असावे सादर..'. अशा वेळी जवळ सुगंधी रुमाल ठेवणे उपयोगी पडते.
८. दूरदर्शनवरील एक लघुपट ज्यात जीवनभर ऐटीत धूम्रपान ओढणाऱ्या माणसाची शेवटी कवटी बनलेली दाखवली आहे असे लघुपट जास्त प्रमाणात दाखवल्यास कुठेतरी मानसिक परिणाम होईलच.