माधवमामा, तुषारने वर त्याच्या प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे ही कथा माहिती तंत्रज्ञान कंपनीमधलीच आहे. आजतागायत मी तरी अशा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कुठल्या स्त्रीला धुम्रपान करताना पाहिलेलं नाही, पण असे काही तुझ्या निदर्शनास आले असल्यास माझे लिखाण एकांगी झाले आहे हे मी मान्य करते आणि त्याबद्दल क्षमस्व.

स्त्रियाही धुम्रपान करतात, हे मला माहिती आहे आणि तसे 'नमुने' मी याची देही याची डोळा बघितलेही आहेत. त्यांच्या त्या कृतीचं मी कधीही समर्थन केलेलं नाही. जे चूक ते चूकच मग ते कोणीही करो.

कथा म्हणून हा विषय रंगवताना माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत हे मला मान्य आहे. योग्य ते बदल करून मी ही कथा पुन्हा लिहिणार आहे आणि मुद्रित स्वरूपात छापली जाऊन अनेक वाचकांपर्यंत पोहोचेल हेही बघणार आहे. माझ्या अकुशल कथालेखनाबद्दलच्या तुझ्या स्पष्ट मताबद्दल मनापासून धन्यवाद.

कथेतील पात्रे कामाच्या ठिकाणी धुम्रपान करतात असं मी अजिबात लिहिलेलं नाही. 'नो स्मोकींग' क्षेत्र त्या कंपनीतही आहे पण अशा ठिकाणी जी व्यक्ती धुम्रपान करून / अथवा न करूनही येते तिच्या केवळ तोंडालाच नाही तर सर्वांगाला धुम्रपानाचा एक विशिष्ट उग्र आणि धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तींसाठी असह्य असा वास येतो, त्याबद्दल तक्रार आहे. धुम्रपान केवळ कामाच्या तासांमध्ये टाळावं ही किमान अपेक्षा सांगितली आहे, ' धुम्रपान पूर्णच सोडून द्या' असा व्यक्तिगत आवडीनिवडींवर घाला घालणारा ( ! ) आग्रह व्यक्त केलेला नाही.

मालिनीचा संघ प्रगती करताना दाखवला असला तरी निखिलचा संघ कामाच्या बाबतीत कमी होता असं म्हणायचं नव्हतं आणि नाही. कामाबद्दल वाद नाहीच आहे. धुम्रपान करणारेच फक्त काहितरी ग्रेट करून दाखवू शकतात असा अलिखित नियम असल्यासारखे भासवले जाते क्षणोक्षणी आणि या चुकीच्या गोष्टीचे नको इतके उदात्तीकरण होताना मी स्वतः पाहिले आहे. ते चुकीचे आहे, इतकंच मला सांगायचं होतं. कथा तितकीशी नीट लिहिता आली नाही हे १००% मान्य पण म्हणून मूळ मुद्दाच चूक हे कधीच मान्य होणे शक्य नाही आणि त्याकरताचा माझा विरोध तसूभरही कमी होणे नाही.