वरील प्रतिसादात आपण 'प्रस्थापित' आणि 'अप्रस्थापित' या शब्दांच्या व्याख्या स्पष्ट केल्यात. माझ्या आक्षेपाचा मुद्दा तो नव्हता.
माझा आक्षेप 'प्रत्येक (प्रस्थापित) भाषा आपल्या जागी श्रेष्ठ असते असे वाटते.' या आपल्या विधानातून 'म्हणजे अप्रस्थापित भाषा श्रेष्ठ नव्हेत' असा जो एक अर्थ अभिप्रेत होऊ शकतो (असे वाटते), त्याला होता.
असो.
- टग्या.
अवांतर: एबॉनिक्स (ebonics: आफ्रिकी वंशाच्या अमेरिकन लोकांची (तथाकथित भ्रष्ट) इंग्रजी भाषा, शब्दशः अर्थ: 'काळे ध्वनी', सामान्यतः मराठीतल्या 'सावळा गोंधळ' अशा अर्थाने!) काय किंवा बंबईया हिंदी काय, या भाषांना स्वतंत्र भाषांचा दर्जा का देण्यात येऊ नये, हा खरोखर विचार करण्यासारखा प्रश्न आहे. (स्वतंत्र भाषा नाही तर किमानपक्षी प्रस्थापित बोली (डायलेक्ट) तरी मानावे, असे माझे व्यक्तिगत मत आहे.) कारण या तथाकथित 'भ्रष्ट'/'अप्रस्थापित' भाषांचेसुद्धा निश्चित असे काही नियम/व्याकरण (जरी कोणीही लिहिण्याच्या फंदात पडले नसले तरी) आहेत, आणि बोलणारा एक निश्चित असा व्यक्तिगट आहे. त्यांना सामाजिक प्रतिष्ठा नसली तरी त्या 'वेल डिफाईन्ड' (कृपया मराठी प्रतिशब्द सुचवावा. 'सुनिश्चित' हा शब्द मनात येतो, परंतु तो कितपत चपखल बसतो, हे कळत नाही.) आहेत.
वस्तुतः बंबईया हिंदी आणि उर्दू यांच्या जन्मामागील अथवा उगमामागील प्रक्रिया एकच आहे. दोन्हींचे मूळ 'परिस्थितीमुळे एकाच ठिकाणी आलेल्या भिन्नभाषीय समाजांच्या परस्परसंपर्काच्या गरजेची पूर्तता करण्याचे माध्यम म्हणून विविध भाषांची सरमिसळ होऊन झालेले एका प्रस्थापित भाषेचे भ्रष्ट स्वरूप' असेच आहे. तरीही उर्दूला मात्र प्रतिष्ठा आणि बंबईया हिंदीला मात्र नाही, हे फारसे योग्य वाटत नाही. उर्दूतल्या उच्चकोटीच्या काव्याबद्दल म्हणाल, तर बंबईया हिंदीत उच्चकोटीचे काव्य नाही म्हणून प्रतिष्ठा नाही, का प्रतिष्ठा नसल्यामुळे कोणी उच्चकोटीचे काव्य करण्याच्या भानगडीत पडत नाही, (का कोणी काव्य केलेच, तर बंबईया हिंदीतले असल्यामुळे त्याला कोणी उच्चकोटीचे मानत नाही, आणि म्हणून कोणी त्या फंदात पडत नाही) हाही एक प्रश्नच आहे.