मी लहान गावात वाढलो पण महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले.

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट, आम्ही भारतात सुट्टी साठी आलो होतो. आई-वडील, भाऊ-वहिनी व आम्ही दोघे दक्षिण भारतात गाडी करून सहलीला गेलो होतो.

म्हैसूर च्या बाजूला छोट्या रस्त्यांवर गाडी आली आणि रस्त्यावरील नावे फक्त कानडीत दिसू लागली. दुकानांच्या पाट्या फक्त कानडीत होत्या. माझ्या मराठीभिमानी वडिलांचा त्रागा झाला "काय लोक आहेत सगळ्या पाट्या जिलब्या जिलब्या".  त्यांना त्यावेळी आमच्या गावाकडे इतर राज्यातील लोक आले की त्यांना काय वाटत असेल याची पूर्ण कल्पना आली. गेल्या पाच वर्षात त्यांचा मराठीतूनच पाट्या असाव्यात चा अट्टहास बराच कमी झाला आहे.

मी सध्या लंडन च्या बऱ्यापैकी प्रतिष्ठित इस्पितळात काम करतो. त्या इस्पितळाच्या पाट्या इंग्रजी, गुजराती, हिंदी, उर्दू भाषांमध्ये पाहून बरे वाटते. साधारण पणे ज्या भाषा बोलणारे लोक त्या परिसरात राहतात किंवा येतात त्या भाषा वापरण्यास काय हरकत असावी?

जाता जाता...माझे काही मित्र बेंगरूळू येथे गेल्या ६-७ वर्षांपासून काम करतात पण त्यांना काडीइतकेही कानडी येत नाही. मात्र त्यांची अपेक्षा असते की पुण्यात शिकणाऱ्या इतर राज्यातील लोकांनी मराठी शिकावी.

खरंच हे नियम म्हणजे आपली प्रगती आहे की अधोगती? 

मनकवडा