अर्थात सर्वाधिक परिणाम हा शिवसेनेच्या आंदोलनाचा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठीत फलक नसलेल्या काही दुकानांवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली
वरील लेखा मध्ये काही भाग अधोरेखित केला आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा मात्र अधोरेखित केलेला नाही. शिवसेनेने दंडुकशाही वापरून काही दुकानदारांना सक्ती केली. लेखाच्या प्रतिसादामध्ये त्याबद्दल शिवसेनेची स्तुतीही करण्यात आली आहे.
एखाद्याने आपल्या दुकानावर इंग्रजी पाटी लावली तर त्याच्या दुकानावर दगडफेक करण्यालायक तो गुन्हा आहे का? आणी हे ठरवून त्याचा रस्त्यावर न्यायनिवाडा करणारी शिवसेना कोण?(हाच धाकदपटशा/गुंडगीरी उद्या तुम्हाला रहात्या घरातून हुसकवण्यासाठी अथवा खंडणी मागण्यासाठी वापरला जाउ शकतो त्याचे काय?)
मराठीमध्ये पाट्या लावण्यासाठी जर कायद्याने सक्ती असेल आणी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दंड आकारला जात असेल तर त्याचे स्वागत आहे. पण त्यासाठी धाकदपटशा दाखवणे हा मार्ग योग्य आहे का?
माझ्या मते दुकानदार मराठीतून पाट्या न लावता इंग्रजीतून लावतात ह्याच्यामागे त्यांना मराठी विषयी द्वेष वगैरे नसून, (शेवटी त्यांना धंद्याशी मतलब आहे) सध्या सगळ्यावर असणारा पाश्चिमात्य पगडा हे आहे. पाट्या बदलायला लावून आपण फक्त फांद्या छाटत आहोत. पिझ्झा हट, आय सी आय सी आय, रिलायन्स कम्युनिकेशन, ह्यांना आपल्या नावातील 'इंग्रजी' अक्षरे 'मराठी'त लिहायला भाग पाडून आपण काय साध्य करणार आहोत? शेवटी नवीनं पिढी ह्या पाट्या बघितल्यावर, 'have you seen that pizza hut board in marathi? it looks so funny' असा 'स्टायलीश' रिमार्क देणार आहे.
माझ्या मते आजकाल जिथे मराठी मनेच इंग्रजी बनत आहेत तिथे पाट्या बदलून काय साध्य होणार होणार? तुकोबांनी म्हटलेच आहे,'नाही मन निर्मळ, काय करिलं साबण?'
मराठी असण्याची अथवा बोलण्याची ज्याला लाज वाटत असेल त्याच्यासारखा करंटा माणूस तोच, पण त्यांसाठी इंग्रजी, हिंदी (जि तर आपली राष्ट्रभाषा आहे) ह्यांचा द्वेष का? इंग्रजी आणी हिंदी ह्यांविषयी बोटे मोडल्याशिवाय मराठीचा अभिमान व्यक्त होऊ शकत नाही का?