कार्यकारी आणि व्यवस्थापकीय क्षेत्रात ज्यांची उठबस असते (आणि आपली उठबस असावी अशी स्व्प्ने असतात) त्यांचा मराठी बद्दलचा हा दुजाभाव नवीन नाही, असे मला वाटते मागे मुंबईचे नाव मुंबई झाले तेव्हा ही ह्या वर्गातल्या बुद्धिमंतांनी आपापल्यापरीने त्यावर तारे तोडलेच! (अगदी पूर्वी पुण्याचे तसे नाव इंग्रजीत झाले तेव्हाही असेच झाले होते.) अशा लोकांना आपले सरकार, त्याचे नियम वगैरे नियम म्हणून पाळायचा तिट्कारा असतो हे मी पाहिलेले आहे. नियम निमूटपणे पाळणे हे फक्त हाताखालच्या लोकांनी करायचे असते, आणि आपण मात्र नियम योग्य की अयोग्य ते ठरवण्याच्या पात्रतेचे आहो अशी त्यांनी समजूत करून घेतलेली असते.
अशा लोकांना वेळोवेळी अशी कायद्याची जाणीव दिलेली बरी असते, नाहीतर व्हिसाच्या रांगेतच काय ते निमूटपणे उभे रहायचे असते बाकी ठिकाणी सगळे आपल्याला हवे तसे करता येते अशी त्यांची मनोधारणा होऊ लागते.
खरे म्हणजे व्यवस्थापकीय शिक्षणातही, जेथे धंदा करायचा तेथल्या संस्कृतीची बंधने पाळणे / तिचा मान ठेवणे हे वर्गात शिकवलेले असते, पण ते ज्ञानही मनापासून न शिकता 'व्यवहारी' दृष्टीकोनातून घेतलेले असल्याने त्याचा सोयिस्कर विसर पडतो असे मला वाटते.