शिवश्री महोदय,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, परंतू, इथे अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलेली नाहीत असे वाटते.
बहुजन समाजाच्या मागासलेपणाबद्दल असणारी आस्था केंव्हाही योग्यच आहे. पण, जरा वस्तुनिष्ठ विचार केलात तर कोणत्याही नवीन धर्माने त्यांचा कोणताही फायदा होणार नाही, हे तुम्हाला कळेल.
बहुजन समाजावर अन्याय झाला, हे कुणीही नाकारू शकत नाही. आणि त्याला कारण ब्राह्मण होते, हेही निर्विवाद! ( हे पटवून द्यायला कोणत्याही वेगळ्या बृहस्पतीची आवश्यकता नाही. ) परंतू, स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदलते आहे. आतातर अशी परिस्थिती आहे, की ब्राह्मण लोकंच त्यांना कुठे थारा मिळेल की नाही या भीतीने हवालदिल आहेत. पण ब्राह्मणांनी काय केले, ह्याचे तुम्ही निरिक्षण केले का? जरी तथाकथित समाजरचनेत ब्राह्मण वरच्या पातळीवर होते, तरी त्यांच्याकडे आर्थिक ताकद फार नव्हतीच. होती ती केवळ विद्या! ह्या विद्येच्या जोरावर ब्राह्मणांनी स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली. ( त्याचा तुम्हाला द्वेष वाटतो. )
पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावर आंबेडकरांच्या कार्याने, विद्येवर , शिक्षणावर कुणा एका वर्गाचा अधिकार राहिला नाही. सर्वांना समान संधी मिळेल असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. पण या उपाययोजनांचा बहुजन समाजाच्या तथाकथित नेत्यांनी फायदा लाटून स्वतःची झोळी भरून घेतली. त्यामुळे ब्राह्मण व बहुजन समाज अशी दरी मिटली नाहीच, परंतू, समाजात प्रत्येकाला इतर वर्गाची भीती वाटू लागली. याच भीतीचा फायदा घेत जातीचे, धर्माचे राजकारण करण्याची परंपरा सुरु झाली. (तुमचा शिवधर्म त्याच रांगेतला आहे का, याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करा! )
समाजातल्या सगळ्या वर्गांची सारख्या गतीने प्रगती होणे, हे आवश्यक आहेच. परंतू, त्याचा मार्ग विधायक असला पाहिजे. किंवा कोणत्याही फुटीच्या किंवा भेदाच्या विघातक मार्गाने समाजाची प्रगती होणार नाही. तुम्ही अतिशय योग्य प्रतिपादन केलेत की बहुजन समाजाचा आणि विद्येचा संबंध अवघ्या दोन चार पिढ्यांचा आहे. मग याच विद्येने केलेली प्रगती तुम्ही दृष्टीआड कशी करू शकता? अनेक समाजसुधारकांनी ( यात ब्राह्मणांचा सहभागही मोलाचा आहे, आगरकर, सावरकर, रानडे इत्यादी) जातीभेद हटवण्यासाठी मोलाचे काम केले आणि आंबेडकरांनी सर्वांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून कार्य केले. ह्याचा परिणाम म्हणजे बहुज समाजातली साक्षरतेची पातळी वाढली, ते पुढे आले. भारताचे माजी राष्ट्रपती मागासवर्गातले होते, आणि त्यांची त्या पदावर निवड केवळ विद्वत्तेने झाली होती, जातीने नाही.
त्यामुळे अशा भेदमूलक शक्तींना दूर ठेवणे हे प्रत्येक सुजाण व्यक्तीचे कर्तव्य आहे, असे मला वाटते. तुम्ही दिलेल्या काही उत्तरांचा परामर्श घेतो.
१. स्त्रीला मानाचे स्थान ! पु. ल. म्हणतात तसे, संस्कृती म्हटले की आधी स्त्रीला वंदन आणि मग तिचे चंदन, अशातली तर गत नाही ना? हे पाहिले पाहिजे.
२. ३. ४. देव मानणे न मानणे किंवा संतांना आणि समाजसुधारकांना स्थान देणे न देणे अतिशय कमी महत्त्वाचे आहे. संत आणि समाजसुधारकांचे विचार शेवटच्या माणसापर्यंत किती पोहोचतात, हे महत्त्वाचे आहे. ( फुल्यांची निर्मिकाच्या कल्पनेला मान्यता देऊन तुम्ही फुल्यांवर उपकार करत आहात का? बहुजन समाजाचा आणि स्त्रियांच्या प्रगतीसाठी फुल्यांनी काही निश्चित अशी योजना सांगितली, ती तुम्हाला गैरलागू का वटते? )
५. इतर जातींविषयी तुम्ही तिरस्काराचे वातावरण तयार करता आणि आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देता, ही विसंगती नव्हे का? (श्री विजय तेंडुलकरांचे कन्यादान हे नाटक आवर्जून वाचा. )
६. लेन ला "साथ" देणाऱ्या "ब्राह्मणाने" नक्की काय केले, ह्याचा शोध घेतलात का? माझ्यामते बहुलकरांनी या विषयावर कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही. "ब्राह्मण संशोधकाने हेतूपुरस्सर (मराठा) शिवाजी राजे आणि जिजामाता यांचे चारित्रहनन केले" असा बिनबुडाचा आरोप तुम्ही करता आहात, यातच तुमच्या नवीन धर्माची दिशा कळते! असो.
७. हिंदूत्त्ववादाकडून तुम्ही शिवधर्मवादी झालात! ह्या परिवर्तनात कोणताही गुणात्मक बदल नाही. फक्त भेद पाडण्याची आवृत्ती बदललेली आहे इतकेच.
९. आंबेडकरांचा वाटा नव्हे, तर आंबेडकरच समाजाच्या उद्धाराला कारणीभूत आहेत असे वाटते. अर्थात, त्यांचे उपकार नाकारण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य (त्याच) घटनेने तुम्हाला दिलेले आहेच! ( मग आंबेडकरांनी सांगितलेल्या बुद्ध धर्मात असे काय कमी आहे, की तुम्हाला शिवधर्माची गरज पडावी?)
असो. माझ्या वरच्या लेखनात कोणताही खोडसालपणा नाही. फूटीच्या राजकारणाची आलेला वीट आणि त्याला मिळणारा सुशिक्षित लोकांचा पाठिंबा, यातून आलेला जो उद्वेग आहे तो व्यक्त झालाय. कोणी कोणती विचारधारा अनुसरावी यावर कोणाचेच बंधन नसले तरीही फूटीच्या विचारधारेचा सर्वांनी एकजुटीने विरोध करावा, असेच वाटते !
आपला,
एकनाथ फडके.