मराठी:
पु. ल. देशपांड्यांची 'हसवणूक' आणि 'तुझे आहे तुजपाशी' ही पुस्तके. (पु. लं. चे लेखनच एकंदरीत खूप आवडते, पण ही पुस्तके विशेषतः.)
विजय तेंडुलकरांचे 'अशी पाखरे येती'. (किंबहुना विजय तेंडुलकरांनी तेवढे एकच चांगले पुस्तक लिहिले आहे, असे माझे खाजगी मत आहे - ते एक, आणि दुसरे 'घाशीराम कोतवाल' बरे आहे. बाकीची भयंकर - म्हणजे 'हॉरिबल' - आहेत, असे मला प्रामाणिकपणे वाटते!)
चिं. वि. जोशी, गडकरी आदींची विनोदी पुस्तके खूप लहानपणी वाचल्याने आता आठवत नाहीत, पण त्या काळी खूप आवडल्याचे स्मरते.
मासिके: एकेकाळी 'किर्लोस्कर' नावाचे एक मासिक निघायचे, ते बरे वाटायचे. पुढे ते बंद पडले, आणि मग 'किस्त्रीम' या नावाखाली त्याचा एक अवतार दिवाळी अंक म्हणून निघू लागला, पण त्यात दम वाटत नाही.
इतर: लहानपणी (म्हणजे तीस्पस्तीस वर्षांपूर्वी) 'किशोर' मासिक वाचायला खूप आवडायचे. पाठ्यपुस्तक मंडळाने काढलेले लहान मुलांचे हे ज्ञानवर्धक परंतु त्याबरोबरच मनोरंजक (किंवा मनोरंजक परंतु त्याबरोबरच ज्ञानवर्धक म्हणा पाहिजे तर) उत्कृष्ट मासिक आजही निघते का?
'चांदोबा'ही बरे वाटायचे, पण 'किशोर'इतके नव्हे. 'प्रेस्टिज प्रकाशना'चे 'बिरबल' हेही लहान मुलांचे मासिक त्या काळी बरे निघत असे. आता निघते की नाही ते माहीत नाही.
इंग्रजी:
पी. जी. वुडहाउसचे कोणतेही पुस्तक, विशेषतः 'ब्लँडिंग्ज कॅसल', 'अंकल फ्रेड' आणि 'स्मिथ' मालिकांमधील.
जॉर्ज मिकॅश या जन्माने हंगेरियन पण द्वितीय महायुद्धापूर्वी ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या लेखकाची, ब्रिटनमधील जीवन व इतरही अनेक विषयांवरील त्याची निरीक्षणे, टीकाटिप्पणी व एकंदरीत 'फिलॉसॉफी ऑफ लाइफ' (येथे 'जीवनविषयक तत्त्वज्ञान' हा मराठी प्रतिशब्द म्हणजे केवळ अवजड शब्दांतर होईल, असे वाटते!) यांच्यावरील त्याच्या खास शैलीतील पुस्तके. विशेषतः 'हाऊ टू बी ऍन एलियन', 'हाऊ टू बी सेवंटी' आणि सर्वात कळस म्हणजे 'हाऊ टू बी गॉड'.
इंग्रजी कॉमिक्स:
'ऍस्टेरिक्स' मालिकेतील कोणतेही, पण विशेषतः 'ओबेलिक्स अँड कंपनी'. 'टिनटिन'ची कॉमिक्ससुद्धा आवडतात, पण 'ऍस्टेरिक्स'इतकी नव्हे.
- टग्या.