परदेशात वास्तव्य करणे हे योग्य की अयोग्य हा पूर्णतः वैयक्तिक प्रश्न आहे.
माझ्या शाळेतील एका मित्राला शाळेत असल्यापासूनच अमेरिकेचे आणि आर्थिक सुबत्तेचे अतिशय वेड होते. तो पदवी घेऊन उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. जेव्हा जेव्हा तो भारतात यायचा तेंव्हा येथील रस्ते,सोयी आणि सरकारी कार्यालयातील / बँकेतील कार्यव्यवस्थेला नाक मुरडायचा आणि भारतात परत कधीच न येण्याचे ठरवून जायचा.
योगायोगाने त्याला भारतीय अध्यात्माचे वेध लागले आणि तो भारतात परत आला.
मला कधीच परदेशाचे वेड नव्हते. जमलेच तर शिक्षणासाठी / संशोधनासाठी जायचे विचार होते. पण मला त्याच सोयी भारतात मिळाल्या. ज्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली त्यांना भारताबद्दल कमालीचा आदर होता. कष्ट करण्याची आपल्या माणसांची तयारी आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन हवे असे त्यांचे मत होते. माझ्या ओळखीचे एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा एक पाय मुंबईत तर दुसरा पाय परदेशी जाणाऱ्या विमानात असतो.
आज माझे काही मित्र भारतात राहून आपापल्या क्षेत्रात इतके निपुण आहेत की इतर देशातील विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला येतात किंवा ते इतर देशात व्याख्यानं द्यायला जातात. आपल्या देशात हल्ली medical tourism वाढले आहे. ह्याचा मला तरी अभिमान आहेच. आपल्या देशात मिळणाऱ्या वैद्यकीय सेवा ह्या कमी दर्जाच्या नसतात हे आता मान्य झाले आहे. ISO cerifications मुळे आंतरराष्ट्रीय दर्जाची रूग्णसेवा आपण देऊ लागलो आहोत.
माझे काही मित्र अमेरिकेत राहून त्यांच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करू लागले आहेत. ह्याचा मला तरी अभिमान आहे. अजूनही आपली ओळख ते 'भारतीय' म्हणूनच करून देतात ही त्यांच्याबद्दल कौतुकाची बाब आहे.
आपण कुठे राहतो ह्यापेक्षा आपण काय करतो हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारतात राहून येथील व्यवस्थेचा स्वार्थासाठी गैरफायदा घ्यायचा आणि तीच वेळ आपल्यावर आली तर मग नावे ठेवायची हा दुटप्पीपणा करण्यापेक्षा भारताबाहेर राहून मानवसेवा केलेली काय वाईट ?