चिकन बर्फात एक दिवस ठेवलं तर एखाद्याला प्राणघातक फटका मारण्याइतकं कडक होत नाही का?
प्रश्न नारदांना असले, तरी उत्तरे(?) आपणच देण्याचा आगाऊपणा करीत आहे. असो. (बाकी चिकन खाणारे -किंवा किमानपक्षी चिकनबद्दल माहिती बाळगणारे - नारद बघून गंमत वाटली. व्हायचेच असे! कालाय तस्मै नमः, वगैरे वगैरे.)
चिकन बर्फात एक दिवस ठेवलं तर एखाद्याला प्राणघातक फटका मारण्याइतकं कडक होत नाही का?
त्याचे काय आहे, गोठवलेल्या चिकनचा आजपर्यंत फक्त एकच उपयोग आम्हास ठाऊक - तो म्हणजे, पिघळवून (defrost अथवा thaw करून) नंतर योग्य प्रकारे (म्हणजे इच्छेनुसार तंदुरी, करी, बटरचिकन अथवा इतर प्रकारे) शिजवून खाणे. त्यामुळे गोठवलेल्या चिकनचा* एखाद्याला (विशेषतः जीव घेण्याच्या उद्देशाने) फटका मारण्यासाठी उपयोग आजतागायत केला नाही. त्यामुळे स्वानुभवाच्या अभावाकारणाने यावर मतप्रदर्शन करणे कठीण आहे. (किंबहुना याच कारणासाठी ते अनुचितही ठरेल.) त्यामुळे याविषयी अधिक माहिती न पुरवू शकल्याबद्दल दिलगीर आहे.
मूळ कथेत गोमांस आहे. तेच ठेवायला हवे होते काय?
काय हरकत आहे? मूळ कथेतील जॉन, मेरी, पीटर वगैरे जर जसेच्या तसे राहिले, त्यांचे जर रामभाऊ, जानकीबाई, गोविंदराव वगैरे झाले नाहीत, आणि ब्रँडीच्या प्याल्याचेही लिंबाचे सरबत (किंवा गेला बाजार चहाचा कपसुद्धा!) झाले नाही, तर मग गोमांसानेच काय घोडे मारलेय? जॉन, मेरी, पीटर वगैरेंना, मला वाटते, गोमांसाचे वावडे नसावे! (आणि कथेचे भाषांतर करताना मूळ पात्रे, प्रसंग वगैरेंचे संपूर्ण मराठीकरण केलेच पाहिजे**, असाही मला वाटते आग्रह नसावा!)
असो. एरवी भाषांतर मला तरी बरे वाटले. आतापर्यंत अनेकांनी म्हटल्याप्रमाणे 'नाकाखालच्या'चे भाषांतर थोडेसे शब्दशः वाटते खरे, पण त्याला मला वाटते फारसा इलाज नसावा.
- टग्या.
*फार कशाला, मूळ कथेतल्याबरहुकुम गोठवलेल्या गोमांसाचासुद्धा अशा प्रकारे उपयोग करून पाहिलेला नसल्याने हत्येच्या त्या मार्गाच्या खात्रीलायकपणावरही भाष्य करू शकत नाही. क्षमस्व.
**तसेच जर संपूर्ण मराठीकरण करायचे झाले, तर मग "माझे दुसरे लफडे आहे, आणि तिला माझ्यापासून मूलही होणार आहे, तेव्हा आता तू मला सोड/मी तुला सोडतो" असे कोणा मराठी नवऱ्याने आपल्या बायकोला सांगितले असता, त्याची मराठी बायको त्याला उत्तर म्हणून शांतपणे "रात्री जेवायला काय करू?" असे विचारेल, असे वाटत नाही.