छान लेख !! तुझ्यामुळे मनात साठलेले अनेक सुगंध-दर्प आठवले.

शाळेत असताना लक्षात राहिलेले शाई, नवीन रेनकोट, कोऱ्या वह्या-पुस्तके, सुगंधी खोडरबरे, बूट पॉलीश इ. चे वास..

नव्या घरातल्या रंगाचा/पॉलीश चा वास. लाकडाला रंधा मारताना येणारा वास..

उघडे गटार, डांबर, पेट्रोल-डिजेल, मिश्री भाजतानाचा श्वास घेणे नकोसा करणारा दर्प !

दृष्ट काढल्यावर मीठ-मोहऱ्या जळताना येणाऱ्या वासाने घरातल्या मोठ्यांच्या चेहेऱ्यावर झळकणारे समाधान !

बाजीराव रस्त्यावरच्या चितळ्यांच्या दुकानात टेंपोतून बाकरवड्या उतरवत असतानाचा गरम गरम बाकरवड्यांचा खमंग वास ! आणि दुकानातून बाहेर पडले की शेजारच्या बिस्किटांच्या दुकानातला चॉकलेटचा वास ! तसेच लक्ष्मी रस्त्यावरच्या पैसा फंड दुकानाच्या जवळच्या कॉफी च्या दुकानाजवळून जाताना कधी एकदा कॉफी पिते असे होऊन जाते. प्रभात रस्त्यावरच्या बुचाच्या फुलांचा घमघमाटातून हलावेसेच वाटत नाही ! मधूनच कुठेतरी येणारा कवठी चाफ्याचा सुगंध.. आमच्या शेजारच्या गच्चीतल्या रातराणीचा धुंद करणारा सुगंध

श्रावणात, व्रत-वैकल्यांच्या काळात तर पंचेंद्रियांची चंगळच असते !! फळे, फुले, पत्री, अत्तर, पंचामृत, उदबत्त्यांचा घमघमाट ! सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी प्रसादाच्या शिऱ्याचा वास !  'बोडण' कालवतानाचा केळीची पाने, पंचामृत, पुरण वगैरेचा एकत्रित वास ! दिवाळीतल्या कुरकुरीत चकल्या ... आहाहा ! बेसनाच्या लाडूसाठी बेसन भाजतानाचा खमंग वास ! भाजणीचे वडे/थालीपीठ, पापड, कुळीथाचे पिठले, भाजलेले शेंगदाणे, कैरीचे करकरीत लोणचे, मोहरी फेसलेले आवळ्याचे लोणचे, लसणीची चटणी इत्यादी जिभेला चटक लावणाऱ्या पदार्थांचे वास.

आता इतक्या सुगंधांची उजळणी झाल्यावर आज डब्यातल्या 'उग्र' वासाच्या कोबीची भाजी खाताना कसंसंच होणार आहे !  :-(