अपूप या पदार्थाबद्दल मी फारसे कुठे वाचलेले नाही. पण शिवाजी सावंतांनी मृत्युंजय मधे त्याचा उल्लेख केला आहे. कर्णाला राधामातेच्या हातचे अपूप फार आवडत असल्याचा त्यात उल्लेख आहे, 'मृत्युंजय' पुस्तकाच्या परिशिष्टामधे अपूप हा एक अनरशासारखा, तांदुळाच्या पिठाचा चवीने गोड पदार्थ होता असे वाचल्याचे आठवते. माझ्या स्मरणशक्तीची अचूकता पडताळून न पाहताच हे इथे लिहून मोकळी झाले आहे तरी कृपया चूभूद्याघ्या...
कथेत वातावरणनिर्मितीसाठी वापरलेले संस्कृतप्रचुर शब्द जरा जड वाटतात असं काही मनोगतींनी मला कळवलं आहे. प्रस्तुत कथा मी ती जशी वाचली होती तशीच लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि अशा प्रकारच्या पुस्तकांमधे किंवा कादंबऱ्यांमधे हे शब्द बरेचदा वाचलेले असल्यामुळे ते काही वेगळेकिंवा विशेष जड वाटले नाहीत म्हणून मी ते तसेच लिहिले. यापुढे मी ही गोष्ट लक्षात ठेवीन... आस्थेने आणि अगत्याने मला प्रतिसाद दिल्याबद्दल शशांक,सुखदा, आनंद जोगळेकर,श्रावणी,माधव कुळकर्णी,राधिका, अनु आणि 'त्या' ची मी आभारी आहे.
याज्ञवल्क्य - मैत्रेयी संवादाबद्दल थोडेसे : याज्ञवल्क्य ऋषींना दोन पत्नी होत्या. त्यातल्या एकीचे नाव मैत्रेयी होते आणि दुसरीचे नाव दुर्दैवाने आत्ता आठवत नाही. याज्ञवल्क्य ऋषींनी वानप्रस्थाला जाताना आपल्या संपत्तीची दोघींमधे समान वाटणी करावी या हेतूने दोघींनाही त्यांच्या इच्छा विचारल्या. तेव्हा मैत्रेयीने लौकिक जगातल्या पार्थिव संपत्तीची इच्छा न करता पारलौकिक कल्याण करणारे ज्ञान आपल्याला मिळावे अशी विनंती केली. त्यानंतर मैत्रेयीने याज्ञवल्क्यांना बरेच प्रश्न विचारले आणि त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे देऊन तिला ज्ञानी केले. स्त्रिया जरी विद्यार्जन करून शास्त्रचर्चा करण्याचा अधिकार बाळगून असल्या तरीही पती-पत्नींनी मिळून शास्त्रांवर, किंवा ज्ञानावर चर्चा करून ज्ञानाची देवाणघेवाण केली असण्याचे हे बहुधा एकमेव उदाहरण असावे. याज्ञवल्यांची विद्वत्ता आणि त्यांना अचूक असे प्रश्न विचारण्यावरून मैत्रेयीची पात्रता या दोन्हीचा इथे प्रत्यय येतो.
अदिती