चिखलदरा, मेळघाट हा भाग वनश्रीने नटलेला आहे.
महाराष्ट्राच्या मोजक्या अभयारण्यापैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने आखलेला आहे.
सिमाडोह ह्या अमरावती जिल्ह्यातल्या ठिकाणी वनखात्याची राहण्याची सोय आहे. त्यासाठी पूर्व कल्पना देऊन आरक्षण करावे लागते. झोपडी (कॉटेज) हा प्रकार अत्यंत स्वस्त असून (३५/- रु. प्र.दि.) जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था असून पूर्ण जंगलातले वातावरण अनुभवायला हे एक उत्तम ठिकाण आहे.
वन्य प्राण्यांशी संबंधीत वस्तू संग्रहालय तेथे असून रात्री व्याघ्र जीवनावरचा लघुपट १६ मी.मी. चलचित्र पडद्यावर दाखवला जातो.
चिखलदराच्या पायथ्याशी असलेल्या सिमाडोह ला जाण्यासाठी स्वतःचे वाहन असणे नेहमी चांगले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवाराच आहे. वाहन शक्यतो ४व्हिलड्राईव्ह (पर्यायी शब्द सुचवा) असल्यास आत खोलवर जंगलात जाता येते.

वन्यजीव निरीक्षणाचा सर्वात उत्कृष्ट काळ म्हणजे एप्रिल व मे महिना (हे तेथे डिसें. मध्ये गेलो तेंव्हा कळले!) ह्या काळात पाण्याची वानवा असल्याने वनखाते संरक्षीत जीवांसाठी कृत्रिम पाणवठे उपलब्ध करतात. जेथे थोड्या प्रतीक्षा काळातच अनेक वन्यजीव बघता येतात. जागोजागी मचाणे बांधून पर्यटकांची सोय करण्यात आलेली आहे.  
वन्यजीव बघायला जाताना शक्यतो लहान मुलांना नेऊ नये - हा माझा अनुभव आहे. एकतर ती गप्प बसत नाहीत, लवकर कंटाळतात व सारखी 'केंव्हा येणार.. केंव्हा दिसणार' चा घोष लावतात. 
तरस, नीलगाय सारखे काही प्राणी बघायला मिळाले परंतू थंडीच्या काळात गेल्याने फारसे प्राणी बघता आले नाही.

चिखलदरा येथेही राहण्याची उत्कृष्ट सोय आहे. मात्र मी सिमाडोह येथे राहिल्याने मी तेथली चौकशी केली नाही. चिखलदरा ह्या थंड हवेच्या ठिकाणी वन्यप्राणी विषयीचे वस्तुसंग्रहालय खास बघण्यालायक आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाचे (MTDC) वास्तव्य स्थान उत्कृष्ट ठिकाणी निवडलेले असून पक्षी निरीक्षणाचा आनंद उपभोगता येतो. 

४ दिवस ह्या दोन ठिकाणांसाठी कमी पडतात परंतू वऱ्हाडातली इतर प्रेक्षणीय स्थळे बघायची असल्यास रविवार ते रविवार असा कार्यक्रम आखल्यास उत्कृष्टच !

येथे किंवा कुठल्याही पर्यटन स्थळाला भेट देण्यापूर्वी तेथल्या व आजूबाजूच्या स्थळांची नेहमी चौकशी करणे तसेच उपलब्ध असल्यास माहितीपत्रक मिळवणे आवश्यक असते.