व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
सगळे कवी, झाले बेभान
'पानांवरती' भरते पान

सारे श्रोते टाकती मान
अंगी कुणाच्या नुरले त्राण
केवळ म्हणती छान छान
बंद करूनी अपुले कान

रान व्याकुळ, जन हैराण
कवी मोकाट, मंडप विराण
संमेलनाची तू अध्यक्षा,
शब्दा तुझ्या गं केवढा मान

म्हणून म्हणतो करू बदल
पुढल्या वर्षी आणू 'खान'
आमिर, शाहरूख, सैफ किंवा
निरागस तो बाल सलमान

साहित्य होईल 'बलवान'
संमेलनात येईल जान
शासनाकडून मिळेल अनुदान
नीट जरा विचार कर - मला तू फक्त हो म्हण

(संमेलनाच्या आयोजकांकडून अध्यक्षांना विनंती)

यंदाच्या मराठी साहित्य आणि नाट्यसंमेलनात उपस्थित रसिकांना दिवसा अनेक तारे दिसले. (हिंदी चित्रपटसृष्टीतले - कविसंमेलनानंतर दिसणारे तारे ते वेगळे. :-)) त्या पार्श्वभूमीवर ह्या ओळी म्हणजे केवळ विडंबन न राहता सत्यस्थिती असल्यास आश्चर्य वाटू नये.

हा रंजक खेळ सुरू केल्याबद्दल वेदश्रीचे आभार. जयंतराव, समीर शुक्ल, लिखाळ, एक_वात्रट, परिमा आणि वेदश्री (दुसरा प्रयत्न) यांनी लिहिलेली समस्यापूर्ती विशेष आवडली.

नंदन